बायडन यांनी पदाची सूत्रे स्वीकारताच घेतला महत्त्वाच्या निर्णय 

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

बायडेन यांनी आपल्या प्रचारसभांमध्ये पॅरिस पर्यावरण करारात परत सहभागी होण्याचे आश्‍वासन दिले होते. शपथविधीनंतर केलेल्या भाषणातही त्यांनी ‘पृथ्वीच्याच अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे’,

वॉशिंग्टन: जागतिक तापमानवाढीशी अमेरिकेचा संबंध नसल्याचे सांगत पॅरिस पर्यावरण करारातून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला बाहेर काढल्यानंतर नव्याने सत्तेत आलेल्या ज्यो बायडेन यांनी देशाला पुन्हा एकदा या कराराचा भाग बनवत लढाईची जबाबदारी स्वीकारली आहे. बायडेन यांनी पदाची सूत्रे स्वीकारताच घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपैक हा एक आहे. 

बायडेन यांनी आपल्या प्रचारसभांमध्ये पॅरिस पर्यावरण करारात परत सहभागी होण्याचे आश्‍वासन दिले होते. शपथविधीनंतर केलेल्या भाषणातही त्यांनी ‘पृथ्वीच्याच अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे’, असे उद्‌गार काढले होते. आपल्या शब्दांना जागत त्यांनी शपथविधीनंतर तातडीने कामकाजाला सुरुवात करत पॅरिस करारात सहभागी होण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. यामुळे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून बाहेर पडण्याबाबत घेतलेला निर्णयही रद्द झाला आहे.

ट्रम्प यांच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचे, वायूचे उत्सर्जन करणाऱ्या कंपन्यांवरील सरकारचे नियंत्रण कमी झाले होते. अनेक जंगलक्षेत्रात त्यांनी खोदकाम करण्यास परवानगी दिली होती. बायडेन यांनी ट्रम्प यांचे पर्यावरणासंदर्भातील सर्व आदेश मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.  

जगभरातील 195 देशांमध्ये पॅरिस येथे झालेल्या पर्यावरण करारानुसार, हवेतील कार्बन प्रदूषकांचे प्रमाण कमी करून जागतिक तापमान वाढ 2 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. 
मात्र, हा करारा विकासाला बाधा आणणारा असल्याचे आणि आमच्यापेक्षा इतर जण अधिक उत्सर्जन करत असल्याचे कारण सांगत ट्रम्प यांनी यातून अंग काढून करारालाच मोठा धक्का दिला होता. सध्या कार्बन उत्सर्जनात अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर असून चीन पहिल्या क्रमांकावर आहे.
 

संबंधित बातम्या