‘रॉ’ प्रमुखांच्या भेटीमुळे ओली यांच्यावर टीका

गोमंतक वृत्तसंस्था
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

भारताच्या संदर्भातील आणखी एक घडामोड नेपाळमध्ये राजकीय वादाचे कारण ठरली. रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (रॉ) या भारतीय गुप्तचर संस्थेचे प्रमुख सामंतकुमार गोयल यांच्याबरोबरील बैठकीचा तपशील पंतप्रधान खडगप्रसाद ओली यांनी जाहीर करावा अशी मागणी स्वपक्षीयांनीच केली.

काठमांडू:  भारताच्या संदर्भातील आणखी एक घडामोड नेपाळमध्ये राजकीय वादाचे कारण ठरली. रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (रॉ) या भारतीय गुप्तचर संस्थेचे प्रमुख सामंतकुमार गोयल यांच्याबरोबरील बैठकीचा तपशील पंतप्रधान खडगप्रसाद ओली यांनी जाहीर करावा अशी मागणी स्वपक्षीयांनीच केली.

ही बैठक दोन तास झाली आणि बुधवारी जवळपास मध्यरात्रीपर्यंत चालली. ओली यांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही, असे नेपाळ कम्युनिस्ट पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांनी सांगितले. यात पुष्पकुमार दहल प्रचंड, झलनाथ खनाल व माधवकुमार नेपाळ या तीन माजी पंतप्रधानांचा समावेश आहे. प्रचंड यांच्याशी अलिकडेच ओली यांचे तीव्र मतभेद निर्माण झाले होते. प्रचंड हे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.

पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत ते म्हणाले की, ही बैठक अयोग्य आणि आक्षेपार्ह आहे. पक्षातील ऐक्य अबाधित ठेवणे माझी जबाबदारी आहे, पण ओली यांच्या गैरकृत्यांमुळे सरकारला फैलावर घेणे मला भाग पडू शकेल. पक्ष तसेच मंत्रीमंडळाला जवळपास अंधारात ठेवून अशी बैठक घेतल्याबद्दल ओली यांनी स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. खनाल आणि माधव यांनी, अशी गुप्त बैठक राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध असल्याचे सांगितले.माजी उपपंतप्रधान भीमबहादूर रावळ आणि नारायण काजी श्रेष्ठ यांनीही टिका केली. माजी परराष्ट्र मंत्री श्रेष्ठ म्हणाले की, बैठकीचे स्वरूप वैयक्तिक होते की अधिकृत, बैठकीत चर्चा झालेले विषय याची माहिती मिळायला हवी.

माजी संरक्षण मंत्री रावळ यांनी या बैठकीची वेळ आणि पद्धत योग्य नसल्याचे सांगितले.सत्ताधारी पक्षाच्या परराष्ट्र खात्याचे उपप्रमुख बिष्णू रिजल यांनी सांगितले की, राजनैतिक विषयांच्या बाबतीत राजकीय नेत्यांनी कधीही कक्षेबाहेर जाण्याचे उल्लंघन करू नये. राजनैतिक अधिकाऱ्यांनीच राजनैतिक विषय हाताळले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या