किम जोंग उन ची दांडगाई; पायरेटेड CD बाळगल्याप्रकरणी मृत्यूदंड 

किम जोंग उन ची दांडगाई; पायरेटेड CD बाळगल्याप्रकरणी मृत्यूदंड 
KIM 1.jpg

उत्तर कोरियामधील (North Korea) अनेक गोष्टी आणि बातम्या अपवादाने जगासोमर येतात. मात्र समोर आलेल्या बातम्या सुध्दा अनेकदा धक्का देऊन जातात. या देशामधील कोणती माहीती जागतिक स्तरावर पाठवण्यात यावी, कोणती नाही हे सर्व हक्क किम जोंग उन (Kim Jong Un) आणि त्यांच्या सरकारमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे आहेत. त्यातच या देशातील कायदे पध्दतीही एकदम विचित्र आहे. नुकतचं उत्तर कोरियाने पायरेटेड साहित्य (Pirated material) आणि माध्यमांसदर्भातील एका कायद्यामध्ये मोठा बदल केला केला आहे. विशेष म्हणजे या कायद्यामध्ये बदल केल्यानंतर एका व्यक्तीला दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा देखील सुनावली आहे. (Kim Jong Un Chi Dandgai Death penalty for carrying a pirated CD)

बदल करण्यात आलेल्या कायद्यानुसार दोषी आढळलेल्या व्यक्तीला सगळ्यांच्या समोर गोळ्या घालून ठार करण्यात आले. नवीन कायदा आंमलात आणल्यानंतर एका व्यक्तीला पायरसी केलेली सीडी विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. पायरसीच्या गुन्हाखाली या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. या व्यक्तीकडे सीडी स्टिक्स आढळून आल्या होत्या. यामध्ये दक्षिण कोरियामधील चित्रपट, गाणी आणि म्युझिक व्हिडिओ होते. या व्यक्तीवरील आरोप सिध्द झाल्यानंतर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. उत्तर कोरियाचे किम जोंग उन हुकुमशाह असून त्यांच्याच सरकारने तयार केलेल्या नियमांनुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

'नाव ली' असं मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. नव्या कायद्यानुसार या व्यक्तीच्या विरोधात देशद्रोह आणि सामाजिक घटकांविरोधात वागणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आले आहेत. ली कडे दक्षिण कोरियामधील चित्रपट, गाणी आणि टिव्ही शो च्या व्हिडिओचा समावेश असणारी सीडी होती. ली याला गोळ्या घालण्याआधी 500 नागरिकांना त्याचा मृत्यू पाहण्यासाठी बोलवण्यात आले होते. यामध्ये ली च्या नातेवाईकांचा देखील समावेश होता. असं डेलीस्टार या इंग्लंडमधील माध्यमाने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

ली च्या शरीरावर 12 जणांच्या स्वाडने गोळ्या झाडल्या. हे सर्व दृष्य पाहणाऱ्या ली च्या कुटुंबिंयाना रडण्याची देखील परवानगी देण्यात आली नव्हती. त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह ट्रकमध्ये टाकून राजकीय कैदी असणाऱ्या कॅम्पमध्ये पाठवण्यात आला. ली च्या नातेवाईक शोक करताना दिसले असते तर त्यांच्या विरोधात देशद्रोही व्यक्तीबद्दल सहानुभुती असल्याचा आरोप ठेवण्यात आला असता.

डिसेंबर 2020 पासून उत्तर कोरियामध्ये कायद्यांमध्ये बदल करण्यात आले असून कायदे अधिक कठोर करण्यात आले आहेत. येथे दक्षिण कोरियामधील गाणी, टीव्ही शो, चित्रपट पाहणे हा नव्या कायद्यानुसार गुन्हा आहे. अस करताना कोणी आढळून आल्यास त्याला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्यात  येते. नव्या कायद्यातील बदलामुळे उत्तर कोरियन जनतेमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com