"डब्ल्यूएचओ' अखेर चीनला पथक पाठविणार

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

सरस मुकाबल्यासाठी कोरोनाचा उगम शोधण्याचा उद्देश

न्यूयॉर्क

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) कोरोना विषाणूच्या उगमाविषयी सरस आकलन व्हावे म्हणून चीनला एक तपासणी पथक पाठविणार आहे. चीनने जनुकीय आराखड्यासह विषाणूची माहिती पुरेशी आणि वेळेत दिली नसल्याचा आक्षेप सुरुवातीपासून घेतला जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अखेर ही घडामोड होणार आहे.
"डब्ल्यूएचओ'चे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसूस यांनी "ऑनलाइन' पत्रकार परिषदेत ही माहिती दिली, मात्र पथकात कोण असणार किंवा नेमकी मोहीम काय व कशी असणार, याचा कोणताही तपशील त्यांनी दिला नाही.
चीनमधील वुहान शहरात पहिल्या रुग्णाची नोंद होण्याच्या घटनेला 29 जून रोजी सहा महिने पूर्ण झाले. तेव्हापासून एक अब्ज रुग्ण आणि पाच लाख मृत्यू अशी आकडेवारी आहे.
घेब्रेयेसूस यांनी सांगितले की, बहुतांश लोक संसर्गाचा धोका आहे. विषाणूचा प्रादुर्भाव होण्यासारखी स्थिती अजूनही आहे. ही साथ संपावी आणि आपण पूर्वीसारखे जीवन जगावे असे आपणा सर्वांना वाटते, पण साथ संपण्याच्या आसपासही नाही ही कटू वस्तुस्थिती आहे. अनेक देशांनी काहीशी प्रगती केली असली तरी प्रत्यक्षात जागतिक पातळीवरील साथ वेगाने पसरते आहे.

मे महिन्यापासून आग्रह

कोरोना विषाणूचे वाहक असलेला मूळ प्राणी कोणता याची तपासणी करण्यासाठी चीनने आपल्या तज्ञांना आमंत्रित करावे, अशी आग्रही मागणी "डब्ल्यूएचओ'कडून मे महिन्याच्या प्रारंभापासून केली जात होती. वुहानमधील बाजारपेठेतील प्राण्यापासून माणसाला संसर्ग झाल्याचे बहुतांश संशोधकांना वाटते.

दक्षिण कोरियाचे उदाहरण

जागतिक पातळीवर सुरक्षित आणि परिणामकारक लस व औषधोपचार शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी त्याशिवाय साथीला यशस्वीपणे आळा घालणे आणि नियंत्रण मिळविणे शक्‍य असल्याचे दक्षिण कोरियाने दाखवून दिले आहे. टेड्रोस यांनी याचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, "त्यासाठी सरकारने निर्बंधांकडे गांभीर्याने पाहायला हवे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा ठावठिकाणा शोधणे, नागरिकांनी हातांची स्वच्छता राखण्यासारख्या उपायांचा जबाबदारीने अवलंब करणे अशा गोष्टींची त्यास साथ हवी.'

उगम कसा सुरू झाला इथपासून विषाणूबद्दल सारी काही माहिती कळली तर आपण त्याचा आणखी सरस मुकाबला करू शकू. ही तयारी करण्यासाठी आम्ही पुढील आठवड्यात पथक पाठवू. त्यातून उगमाचे आकलन होण्यास मदत होईल अशी आशा आहे.
- टेड्रोस घेब्रेयेसूस, "डब्ल्यूएचओ'चे महासंचालक

संबंधित बातम्या