सिंगापूरला लुंग यांचीच सरशी

Avit Bagle
रविवार, 12 जुलै 2020

पीपल्स अॅक्शन पार्टीला स्पष्ट बहुमत

सिंगापूर

सिंगापूरमधील सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला असून पंतप्रधान विद्यमान ली शीएन लुंग यांचीच सरशी झाली आहे. 1965 पासून सत्तेवर असलेल्या पीपल्स अॅक्शन पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
शुक्रवारी 26 लाख लोकांनी मतदान केले होते. 2015 सत्ताधारी पक्षाला 69.9 टक्के मते मिळाली होती. ही टक्केवारी 61.24 इतकी कमी झाली, पण 93 पैकी तब्बल 83 जागांवर सत्ताधारी पक्षाचे उमेदवार विजयी झाले.
लुंग यांनी कोरोनाची जागतिक साथ पसरली असतानाही निवडणूक घेतली होती. अशा भयंकर परिस्थितीतही जनतेने आपल्या पक्षाची धोरणे आणि योजनांना असलेल्या पाठिंब्यावर शिक्कामोर्तब करणारा कौल दिला, अशी प्रतिक्रिया लुंग यांनी व्यक्त केली. 68 वर्षीय ली हे सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यूव यांचे सर्वांत धाकटे पुत्र आहेत. 2004 पासून ते या पदावर आहेत.
वर्कर्स पार्टी या विरोधी पक्षासाठी दहा जागांची कमाई सुद्धा विक्रमी ठरली. 21 जागांवर त्यांचे उमेदवार रिंगणात होते. याआधी त्यांच्या खात्यात सहा जागा होत्या. भारतीय वंशाचे प्रीतम सिंग हे सरचिटणीस आहे. ते विरोधी पक्षनेते असणे उचित ठरेल. त्यांना कामकाज पाहण्यासाठी आवश्यक तो कर्मचारिवर्ग पुरविला जाईल, असे लुंग यांनी सांगितले.

सध्याच्या परिस्थितीत काय पणाला लागले आहे आणि राष्ट्रीय हितासाठी आपण सर्वांनी एकत्र का आलेच पाहिजे याची सिंगापूरवासीयांना जाणीव आहे. जनतेचा कौल मिळाल्यानंतर आम्ही तो जबाबदारीने वापरण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. कोरोनाच्या संकटातून आणि त्यानंतर आम्ही सिंगापूरला सुरक्षितपणे पुढे नेऊ.
- ली शीएन लुंग, सिंगापूरचे पंतप्रधान

संबंधित बातम्या