ट्रम्प यांच्या काळात दिशा भरकटली

PTI
मंगळवार, 28 जुलै 2020

अमेरिकेत झालेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष; निवडणूक शंभर दिवसांवर

वॉशिंग्टन

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक आता शंभर दिवसांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण घेतले असता विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात देशाची दिशा भरकटली असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. या सर्वेक्षणामुळे ट्रम्प यांच्यासमोरील अडचणी वाढल्या असून डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार ज्यो बिडेन यांचा उत्साह वाढला आहे.
असोसिएटेड प्रेस आणि नॉर्क सेंटर यांनी हे सर्वेक्षण घेतले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील कोरोना परिस्थितीची नीट हाताळणी केली नसल्याचेही नागरिकांचे मत असून ट्रम्प यांच्या कोरोनाबाबतच्या दृष्टीकोनाला केवळ ३२ टक्के जनतेचाच पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर आलेल्या संकटाचा ट्रम्प यांना सामना करावा लागत असला तरी त्यांच्या आर्थिक धोरणांनाही लोकांचे समर्थन कमी होत आहे. सर्वेक्षणाच्या या अहवालामुळे ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेची दिशा अमूलाग्र बदलण्याची शक्यता आहे. वास्तव आणि ट्रम्प यांचे दावे यांच्यात मोठा फरक असल्याचे जनतेचे मत आहे. संसर्ग वेगाने वाढत असतानाही ट्रम्प यांनी त्याला कधीही फारसे महत्त्व दिले नाही. आता तेच परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याचा इशारा देत आहेत. मास्कचे महत्त्व दुर्लक्षणारे ट्रम्प आता कुठे लोकांना मास्क वापरण्यास सांगत आहेत, पण स्वत: मात्र वापरत नाहीत. ऑगस्टमध्ये मोठी प्रचार मोहिम घेण्याचे समर्थकांना आश्‍वासन देतात, आणि नंतर ही मोहिम रद्दही तेच करतात. अशा त्यांच्या धोरणामुळे त्यांची लोकप्रियता झपाट्याने कमी होत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
याउलट, बिडेन यांनी स्वत:बाबत विश्‍वासाचे वातावरण तयार केले आहे. उभारलेला निधी आणि पक्षातील सर्व नेत्यांना एकत्र आणल्यामुळे त्यांच्या प्रचारसभांना चांगला पाठिंबा मिळाला. शिवाय, ट्रम्प यांच्याबाबत घटत्या लोकप्रियतेचाही त्यांना फायदा होईल, असा अंदाज आहे.

सर्वेक्षणातील निष्कर्ष
- देशाची दिशा भरकटल्याचे ८० टक्के जनतेचे मत
- अर्थव्यवस्था संकटात आल्याचे ६२ टक्के जनतेचे मत
- ट्रम्प यांच्या कार्यक्षमतेवर ३८ टक्के जनतेचाच विश्‍वास
- २० टक्के रिपब्लिकन जनतेला ट्रम्प यांच्यावर अविश्‍वास

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या