युरोप पुन्हा लॉकडाऊनमध्ये..जर्मनी आणखी पाच महिने बंद

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

कोरोनाच्या जागतिक साथीच्या नव्या लाटेने युरोपला वेढण्यास प्रारंभ केला आहे. ऑस्ट्रीयात दुसरे राष्ट्रीय लॉकडाउन लागू करण्यात आले आहे, तर जर्मनीत पुढील चार ते पाच महिने कठोर निर्बंधांना सामोरे जाण्याची तयारी नागरिकांनी ठेवावी असे सरकारने बजावले आहे.

व्हिएन्ना :  कोरोनाच्या जागतिक साथीच्या नव्या लाटेने युरोपला वेढण्यास प्रारंभ केला आहे. ऑस्ट्रीयात दुसरे राष्ट्रीय लॉकडाउन लागू करण्यात आले आहे, तर जर्मनीत पुढील चार ते पाच महिने कठोर निर्बंधांना सामोरे जाण्याची तयारी नागरिकांनी ठेवावी असे सरकारने बजावले आहे.

ऑस्ट्रीयात नोव्हेंबरच्या प्रारंभीच रात्रीची संचारबंदी आणि अंशात्मक लॉकडाउन सुरू करण्यात आले होते. आता पुढील किमान दोन ते अडीच आठवडे देशव्यापी लॉकडाउन असेल. हा कालावधी आता सहा डिसेंबरपर्यंत नक्की करण्यात आला आहे. शुक्रवारी ऑस्ट्रीयात ९५८६ रुग्णांची नोंद झाली, जी वर्षाच्या प्रारंभी संसर्ग तीव्र असतानाच्या तुलनेत नऊ पट जास्त आहे.

स्वीडन
नाताळचे सेलीब्रेशन आणि नववर्षाच्या स्वागतासाठी प्रवासाची योजना आताच आखणे घाईचे ठरेल असा इशारा सरकारने नागरिकांना दिला आहे.

इटली 
रेड झोनच्या यादीत कॅम्पानिया आणि टस्कनी या विभागांची भर. रविवापरासून कडक लॉकडाउन लागू. कॅम्पानियामध्ये आरोग्य सेवा कोलमडण्याचा अधिकाऱ्यांचा इशारा.

पोर्तुगाल 
रात्रीच्या संचारबंदीची व्याप्ती वाढविली. एक तृतीयांश देशात कडक निर्बंध. शनिवारी बार आणि रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांची लिस्बनमध्ये सरकारच्या विरोधात निदर्शने.

युक्रेन 
नव्या रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ. अध्यक्ष वोल्डोमायर झेलेन्स्की यांना कोरोनाचा संसर्ग. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू.

केवळ फ्रान्समध्ये दिलासा
युरोपात कोरोनाच्या संदर्भातील चित्र केवळ फ्रान्समध्ये आशादायक आहे. तेथे यापूर्वीच राष्ट्रीय लॉकडाउन लागू झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात दिलासा मिळाला असून नवे रुग्ण आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे.

"नव्या लाटेच्या दबावामुळे आरोग्यसेवा कोलमडू नये म्हणून लॉकडाउनच्या रूपाने शेवटची संधी आहे. ऑस्ट्रीयन जनतेने आधीच एकदा लॉकडाउन पाळले आहे. ते पुन्हा तसे साध्य करू शकतील."
- रुडॉल्फ अँश्चोबर, 
ऑस्ट्रीयाचे आरोग्य मंत्री

"वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी घराबाहेरील कुणाही व्यक्तीला भेटू नये. शाळा बंद राहतील आणि मंगळवारी नवे निर्बंध निश्चित होईपर्यंत विद्यार्थ्यांनी घरातून ऑनलाइन शिक्षण घ्यावे."
- सेबॅस्टीयन कुर्झ, 
ऑस्ट्रीयाचे चॅन्सेलर

जर्मनीमध्ये आणखी पाच महिने निर्बंध
नवी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी आणखी चार ते पाच महिने कठोर निर्बंधांना सामोरे जाण्याची तयारी  
ठेवावी. हे निर्बंध लवकर शिथिल केले जाण्याची अपेक्षा बाळगू नये, असा इशारा जर्मन जनतेला अर्थ मंत्री पीटर अल्टामैर यांनी दिला.
फ्रान्समध्ये काही आठवड्यांपूर्वी रोज पन्नास हजार नवे रुग्ण आढळत होते. आपल्यावर अशी वेळ येऊ नये असे वाटत असेल तर कोणते निर्बंध पुन्हा शिथिल होण्याची शक्यता आहे याचे अंदाज सतत बांधणे थांबवावे लागेल. ज्या देशांनी लवकर निर्बंध उठविले, त्यांना जिवीतहानीची मोठी किंमत चुकवावी लागली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
जर्मनीत लाईट लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. हॉटेल-बार बंद असले तरी शाळा आणि दुकाने सुरू आहेत.

"आपण अद्याप संकटातून बाहेर पडलेलो नाही. अर्थव्यवस्था वारंवार बंद करणे आणि सुरू करणे आपल्याला परवडणार नाही."
- पीटर अल्टामैर, 
जर्मनीचे अर्थ मंत्री

"रुग्णालयांत काटा आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा पुन्हा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आणखी निर्बंधांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल."
- फ्रँक उलरीच माँटगोमेरी, 
वैद्यकीय संघटनेचे जर्मन प्रमुख

संबंधित बातम्या