जगातील सर्वांपर्यंत कोरोना लस पोहोचण्यासाठी २०२२ उजाडणार

PTI
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

जगातील जवळपास २५ टक्के जणांना २०२२ पर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होणारच नाही, असा अंदाज काही अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

वॉशिंग्टन  :  जगातील जवळपास २५ टक्के जणांना २०२२ पर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होणारच नाही, असा अंदाज काही अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच, लस विकसीत करणे जितके आव्हानात्मक होते, तेवढेच मोठे आव्हान ही लस सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. जगातील ३.७ अब्ज जणांना लस टोचवून घेण्याची इच्छा आहे.

याबाबतचा अभ्यास ‘द बीएमजे’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूलने कोरोनावरील संभाव्य लशींच्या जगभरातील देशांनी नोंदविलेल्या मागण्यांचा आणि लशींच्या उत्पादनांचा अभ्यास केला. जगातील श्रीमंत देशांनी आपल्या नागरिकांसाठी कोरोना लशींचा भविष्यातील साठ्याचीही नोंदणी करून ठेवली आहे. इतर गरीब देशांना मात्र लशींच्या उपलब्धतेवर आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीवरच अवलंबून रहावे लागणार आहे. उत्पादन वेगाने वाढल्यास आणि सरकारने योग्य नियोजन केल्यास सर्वांपर्यंत कदाचित लस पोहोचू शकेल, असे संशोधकांनी म्हटले आहे. 

 

अहवालातील माहितीनुसार, १५ नोव्हेंबरपर्यंत जगातील १३ लस उत्पादक कंपन्यांकडे ७.४८ अब्ज लशींच्या डोसची मागणी करण्यात आलेली आहे. यातील निम्मे डोस हे जगातील केवळ १४ टक्के लोकसंख्या असलेल्या श्रीमंत देशांकडेच जाणार आहेत. उर्वरित अर्ध्या लशी ८५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येसाठी उरणार आहेत. सर्वच लशींना मान्यता दिली आणि त्यांनी वेगाने उत्पादन केले, तरी एकूण पायाभूत सुविधा, साठवणूक क्षमता यांचा विचार करता २०२१ च्या अखेरपर्यंत ५.९६ अब्ज लशी तयार होतील. यातील श्रीमंत देशांकडे जाणारा साठा वगळून उरलेल्या लशी गरीब आणि मध्यमवर्गीय देशांना मिळणार आहेत. त्यातही श्रीमंत देशांनी पैसे भरून आणखी मागणी नोंदविल्यास गरीब देशांमधील जनतेला लशीसाठी बरीच वाट पहावी लागू शकते, असे या अभ्यासात म्हटले आहे.

 

ट्रम्प यांचे ‘पहले आप’..

कोरोना प्रतिबंधासाठीच्या कोणत्याच नियमाला महत्त्व न देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लस घेण्यातही फारसा उत्साह नसल्याचे आज दिसून आले. ‘अध्यक्ष ट्रम्प हे लस घेण्यास तयार आहेत, पण आरोग्य सेवकांसह इतर कोरोना योद्ध्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे प्राधान्य आहे,’ असे ‘व्हाइट हाउस’तर्फे आज सांगण्यात आले. अध्यक्षीय निवडणुकीच्या ऐन धामधुमीत ट्रम्प यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, त्यानंतरही त्यांनी कोरोनाचे गांभीर्य मान्य करण्यास नकार दिला होता. जॉर्ज डब्लू बुश, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा हे तीन माजी अध्यक्ष जाहीररित्या लस घेऊन लोकांना प्रोत्साहन देणार आहेत. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे सध्या अमेरिकी माध्यमे आणि सोशल मीडियामध्ये चर्चेला उधाण आले आहे.

 

अधिक वाचा :

रशियन हॅकरचा अमेरिकेवर हल्ला

आग्नेय ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा ‘अवतार'

कोरोनावर यूव्ही-एलईडी परिणामकारक

संबंधित बातम्या