मेधा राज बनल्या बायडेन यांच्या डिजिटल प्रचारक

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

कोरोनामुळे सर्वस्वी ऑनलाइन प्रचार मोहिमेची जबाबदारी

वॉशिंग्टन

अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देण्यास सज्ज झालेले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी डिजिटल प्रचारप्रमुख म्हणून भारतीय वंशाच्या मेधा राज यांची नियुक्ती केली आहे.
कोरोनाच्या साथीमुळे संपूर्ण प्रचार "ऑनलाइन' होणार असल्यामुळे त्यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्राथमिक फेरीतील उमेदवार पीट बुट्टीजेज यांच्या प्रचार पथकात मेधा यांचा समावेश होता. गतवर्षी ऑगस्टपासून यंदा मार्च असे आठ महिने त्यांनी हे काम केले.
"सीएनएन'च्या वृत्तानुसार बायडेन यांनी संपूर्ण डिजिटल प्रचाराच्या दृष्टीने अनेक नव्या तज्ज्ञांना नियुक्त केले आहे. तळागाळातील निधीउभारणीसाठी डिजिटल प्रचार उपप्रमुख म्हणून क्‍लार्क हम्फ्री, डिजिटल संघटन संचालक म्हणून ज्योस नूनेझ आणि डिजिटल भागीदारी संचालक म्हणून ख्रिस्तीयन टॉम यांचा पथकात समावेश करण्यात आला आहे.
या चौघांनी मिळून डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार कमला हॅरिस, पीट व हिलरी क्‍लिंटन यांच्यासाठी काम केले आहे. त्यांचा अनुभव तसेच "ट्विटर' आणि "नाऊथीस' अशा कंपन्यांचे ऑनलाइन कौशल्य प्रचार मोहिमेसाठी पणास लावले जाईल.
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील संकटामुळे व्यक्तिगत पातळीवरील प्रचार पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात ऑनलाइन तसेच ऑफलाइन प्रचाराच्या माध्यमातून मतदारांना प्रभावित करणे आवश्‍यक ठरले आहे.

कोण आहेत मेधा राज
- दक्षिण कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसच्या रहिवासी
- जॉर्जटाऊन विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय राजकारणाची पदवी
- स्टॅनफोर्ड विद्यापीठातून "एमबीए'
- स्पेनमधील रिअल इन्स्टिट्यूट एल्कॅनोमध्ये सहायक संशोधक
- डेलॉइट कंपनीच्या सल्लागार
- लॉस एंजेलिसचे महापौर एरिक गॅर्सेट्टी यांच्या कार्यालयात नियुक्ती
- कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदासाठी गावीन न्यूसॉम यांच्या प्रचार पथकात सहभाग

बायडेन यांच्या प्रचार मोहिमेत डिजिटल आघाडीची प्रमुख म्हणून मी दाखल झाले असून, हे तुम्हास सांगताना रोमांचित झाले आहे. निवडणुकीसाठी 130 दिवस बाकी असून आम्ही एक मिनीटसुद्धा दवडणार नाही.
- मेधा राज

संबंधित बातम्या