अवकाशात नेलेल्या उंदरांवरील प्रयोगामुळे शरीराची झीज रोखण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल

पीटीआय
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

दीर्घ अवकाश मोहिमांदरम्यान अवकाशवीरांच्या शरीरातील मांसपेशींची आणि हाडांची होणारी झीज रोखण्यासाठी अमेरिकेतील जॅक्सन प्रयोगशाळेतील डॉ. से-जिन ली यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या वर्षी एक प्रयोग केला.

केप कॅनव्हेराल (अमेरिका): सुमारे महिनाभर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पाहुणचार झोडून पृथ्वीवर परतलेले ‘विशेष अवकाशवीर’ सुदृढ झाले असून, संशोधनात हा एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असल्याचे अमेरिकेतील संशोधकांनी आज जाहीर केले. उंदरांवर केलेल्या या प्रयोगाचा उपयोग शरीराची आणि हाडांची झीज रोखण्यासाठी उपचार म्हणून करता येऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 

दीर्घ अवकाश मोहिमांदरम्यान अवकाशवीरांच्या शरीरातील मांसपेशींची आणि हाडांची होणारी झीज रोखण्यासाठी अमेरिकेतील जॅक्सन प्रयोगशाळेतील डॉ. से-जिन ली यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या वर्षी एक प्रयोग केला. या प्रयोगाचा निष्कर्ष ‘नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

संशोधकांनी स्पेसएक्स रॉकेटच्या साह्याने डिसेंबर महिन्यात काळ्या उंदराच्या ४० माद्यांना अवकाशात पाठवले. यातील २४ उंदरांवर काहीही प्रयोग केला नव्हता, तर आठ उंदीर हे जनुकीय तंत्रज्ञानाद्वारे विकसीत केलेले उंदीर होते. त्यांच्या मांसपेशींचा आकार सामान्य उंदराच्या मांसपेशीपेक्षा दुप्पट होता. याशिवाय, उर्वरित आठ सामान्य उंदरांवर प्रयोग करून त्यांची ताकद वाढविण्यात आली होती. 

एक महिन्यानंतर या सर्व उंदरांना पृथ्वीवर परत आणण्यात आले. या सर्वांचा अभ्यास केला असता, प्रयोग न केलेल्या उंदरांच्या मांसपेशींची आणि हाडांची लक्षणीयरित्या झीज झाल्याचे दिसून आले. त्यांचे वजनही १८ टक्क्यांनी कमी झाले. मात्र, विकसीत केलेल्या उंदरांच्या शरीरामध्ये कोणताही फरक पडला नाही. ‘नासा’च्या अवकाशकेंद्रात निरीक्षणाखाली ठेवलेल्या जनुकीय विकसीत उंदरांच्या मांसपेशींइतकाच अवकाशातून आलेल्या या उंदरांच्या मांसपेशींचा आकार होता. 

विशेष म्हणजे, ताकद वाढवून पाठविलेल्या आठ सामान्य उंदरांच्या मांसपेशीमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या उंदरांवर मांसपेशींच्या वाढीवर मर्यादा आणणारी प्रथिने अडविण्याचा प्रयोग करण्यात आला.  या प्रयोगामुळे नवीन उत्साह संचारला असून पुढील संशोधनाला बळ मिळाले आहे, असे ली यांनी सांगितले. हा प्रयोग प्राथमिक असून मानवावर प्रयोग करण्यापूर्वी बरेच संशोधन आवश्‍यक असले तरी त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे, असे ते म्हणाले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या