चीनवर आणखी कारवाई होणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 जुलै 2020

अमेरिका लवकरच तपशील जाहीर करणार

वॉशिंग्टन

चीनविरुद्ध आणखी कारवाई करण्यासाठी अमेरिका तयारीत आहे, पण अध्यक्षीय पातळीवर कोणती पावले टाकली जाणार याचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
व्हाइट हाउसचे प्रशासन प्रमुख मार्क मेडोज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन आणि परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ अशा प्रमुख अधिकाऱ्यांनी अलीकडेच चीनच्या विरोधात वक्तव्ये केली आहेत. यासंदर्भात व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कायली मॅकेनानी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्या म्हणाल्या की, चीनविरुद्ध आम्ही काय कारवाई करणार याचा तपशील देऊन मी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकक्षेचे उल्लंघन करू इच्छित नाही. काही उपायांबद्दल तुम्हाला माहिती मिळेल हे मात्र मी नक्की सांगू शकते.
ओब्रायन यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षामुळे अमेरिकेसमोरील धोके या विषयावर दोन आठवड्यांपूर्वी अॅरिझोनामध्ये भाषण दिले होते, तर एफबीआयचे संचालक ख्रिस्तोफर व्राय यांनी कालच भाषणात म्हटले होते की, चीन बौद्धिक संपदेची जबरी चोरी करीत आहे.

टीकटॉक, वुइचॅटवर बंदी येणार

अमेरिकेत चीनची अॅप जास्त वापरली जात नाहीत, पण टीकटॉक आणि वुइचॅटबाबत ट्रम्प फार बारकाईने विचार करीत आहेत. यासह इतर काही अॅपच्या माध्यमातून चीन सरकार अमेरिकी नागरिकांची वैयक्तिक व गोपनीय माहिती मिळवीत असल्याचा अमेरिकेला संशय आहे.

अमेरिका असे चालू देणार नाही

ओब्रायन यांनी आक्रमक भाषा वापरली होती. चीन आणि त्यांचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष केवळ हाँगकाँगमध्येच कारवाया करतो आहे असे नाही. त्यामुळे तुम्हा सर्वांवर परिणाम होतो आहे. अमेरिका आपण ज्या पद्धतीने चालवितो त्यालाही धक्का बसतो आणि आम्ही हे घडू देणार नाही, असे ते म्हणाले होते.
चीनवर विविध नेते टीका करीत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे काँग्रेस सदस्य मॅट गेट््झ यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने जास्त चिवट आणि दक्ष राहावे तसेच चीन हा शत्रू आहे या वस्तुस्थितीची जाणीव ठेवायला हवी. मुख्य म्हणजे त्यांच्या कंपन्या तसेच अमेरिकेतील व्यवहारांना डॉलरच्या रूपाने पाठबळ देऊन शत्रूला मदत करू नये.
कोरोनाची साथ जगात पसरताच आणि अमेरिकेतील संसर्ग तसेच मृतांची संख्या वाढत असताना ट्रम्प यांनी कोरोनाबद्दल चीनला दोषी धरले असून आशियातील या महासत्तेने कोरोनाची हाताळणी करण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करणे, उईघुर मुस्लिमांची बळजबरीने नसबंदी व गर्भपात करण्याचे आरोप आणि तिबेटमधील सुरक्षा कारवाया अशा घडामोडींमुळे अमेरिका-चीन यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत.

नवा सुरक्षा कायदा लागू करून चीनने हाँगकाँगवर कब्जा मिळविला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत चीनच्या संदर्भात महत्त्वपूर्ण उपाय लागू झालेले तुम्हाला पाहायला मिळेल. चीनच्या विरोधात ट्रम्प ज्या पद्धतीने उभे ठाकले आहेत, तसे यापूर्वी कोणत्याही अध्यक्षाला जमले नव्हते. व्यापारातील दरी भरून काढण्यासाठी चीनवर प्रचंड आयातकर लागू केलेले ते पहिले अध्यक्ष होत.
- रॉबर्ट ओब्रायन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या