नासा खरेदी करणार चंद्रावरील माती

वृत्तसंस्था
शनिवार, 5 डिसेंबर 2020

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ आता खासगी अवकाश कंपन्यांकडून चंद्रावरील माती खरेदी करणार आहेत. यासाठी चार कंपन्यांना कंत्राट देण्याची घोषणा संशोधन संस्थेकडून करण्यात आली. या कंत्राटाची मर्यादा साधारणपणे एक ते पंधरा हजार डॉलरपर्यंत असेल.

न्यूयॉर्क :  अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ आता खासगी अवकाश कंपन्यांकडून चंद्रावरील माती खरेदी करणार आहेत. यासाठी चार कंपन्यांना कंत्राट देण्याची घोषणा संशोधन संस्थेकडून करण्यात आली. या कंत्राटाची मर्यादा साधारणपणे एक ते पंधरा हजार डॉलरपर्यंत असेल अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या चंद्रावरील माती गोळा करण्यासाठी खासगी कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा लागली आहे. भविष्यामध्ये या उपग्रहावरील खनिज संशोधनाला देखील गती मिळू शकते, असे भाकीत संशोधकांनी वर्तविले आहे. ‘लुनार आऊटपोस्ट ऑफ गोल्डन कोलोरॅडो’, टोकियोतील ‘आयस्पेस जपान’, लक्झेमबर्ग येथील ‘आयस्पेस युरोप’, कॅलिफोर्नियामधील ‘मास्टन स्पेस सिस्टिम मोजावे’ या कंपन्यांना विविध रकमांची कंत्राटे देण्यात आली असून त्या चंद्रावरील मातीचे नमुने गोळा करतील.

 

"केवळ २५ हजार डॉलरमध्ये आम्हाला चंद्रावरील मातीचे नमुने मिळतील ही कल्पनाच नावीन्यपूर्ण आहे."
- फिल मॅकॲलिस्टर, संचालक, कमर्शिअल स्पेस फ्लाइट डिव्हिजन, नासा

 

मालकी नासाकडेच

काही खासगी कंपन्या चंद्रावरील मातीचे नमुने गोळा करण्यासाठी २०२२ आणि २०२३ मध्ये मानवविरहित मोहिमा राबविणार आहे. यामाध्यमातून चंद्रावरील माती आणि खडकावरील पापुद्र्याचे नमुने गोळा करण्यात येतील. पुढे या मातीचा मालकी हक्क नासाकडे सोपविण्यात येईल.

मंगळ मोहिमेचे आव्हान

नासाने २०२४ मध्ये चंद्रावर मानव उतरविण्याचे नियोजन आखले असून या माध्यमातून मंगळावरील मोहिमेची देखील पायाभरणी करण्यात येईल. मंगळ मोहिमेच्या अनुषंगाने ही चंद्र मोहीम खूप महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे पण मंगळावरील मोहीम ही सर्वाधिक आव्हानात्मक असेल असे संशोधकांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या