नेल्सन मंडेला यांच्या मुलीचे निधन

Avit Bagle
मंगळवार, 14 जुलै 2020

त्या दक्षिण आफ्रिकेच्या डेन्मार्कमधील राजदूत होत्या. त्यांच्या निधनाचे कारण सांगण्यात आले नाही.

जोहान्सबर्ग

दक्षिण आफ्रिकेचे दिवंगत कृष्णवर्णी नेते नेल्सन मंडेला यांची कन्या झिंदझी (59) यांचे सोमवारी सकाळी येथील एका रुग्णालयात निधन झाले. त्या दक्षिण आफ्रिकेच्या डेन्मार्कमधील राजदूत होत्या. त्यांच्या निधनाचे कारण सांगण्यात आले नाही. नेल्सन मंडेला प्रतिष्ठानने याविषयी करण्यात आलेल्या विनंतीवर प्रतिसाद दिला नाही. मंडेला यांनी त्यांच्या चळवळीमुळे होणाऱ्या हिंसाचाराचा धिक्कार केल्यास तुरुंगातून सुटका करण्याचा प्रस्ताव 1985 मध्ये अल्पसंख्य गोऱ्या नागरिकांच्या सरकारने ठेवला होता. तो फेटाळल्याचे पत्र मंडेला यांनी तुरुंगातून लिहिले होते. ते झिंदझी यांनी वाचून दाखविले होते. हा प्रसंग जगभरात दूरचित्रवाणीवरून दाखविण्यात आला. त्यामुळे त्या प्रकाशझोतात आल्या. वडील तसेच आई विनी यांना अनेक वेळा कारावास भोगावा लागल्यामुळे त्यांचे बालपण विस्कळीत झाले. झिंदझी 2015 पासून डेन्मार्कमध्ये नियुक्त होत्या. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे प्रवक्ते पॉल माबे यांनी सांगितले की, झिंदझी यांचे आकस्मिक निधन धक्कादायक आहे. आपल्या समाजाच्या उद्धारासाठी आणि पक्षाच्या वाटचालीसाठी त्यांना आणखी मोठी भूमिका पार पाडायची होती.

संबंधित बातम्या