नेपाळ पुरातत्त्व खाते थोरीमध्ये उत्खनन करणार

Avit Bagle
शनिवार, 18 जुलै 2020

ओलींच्या वक्तव्याला आधार नसूनही योजना

काठमांडू

श्रीरामाचे खरे जन्मस्थान अयोध्या नव्हे तर थोरी असल्याच्या पंतप्रधान खडगप्रसाद शर्मा ओली यांच्या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी टीका केली असली तरी नेपाळच्या पुरातत्त्व खात्याने ते गांभीर्याने घेतले आहे. दक्षिण नेपाळमधील त्या परिसरात संशोधन व त्यासाठी उत्खनन करण्याची योजना आखली जात आहे.
‘माय रिपब्लिका’ या वृत्तपत्राने खात्याचे प्रवक्ते रामबहादुर कुंवर यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. त्यानुसार बिरगंजमधील थोरी येथे उत्खनन सुरु करण्याबाबत विविध मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांसह बैठका होत आहेत. खात्याचे महासंचालक दामोदर गौतम याकडे गांभीर्याने बघत आहेत. तज्ञांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल.
आधार नसल्याचे मान्य...
ओली यांनी दावा केला असली तरी अयोध्या नेपाळमध्ये असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणताही आधार नसल्याची या खात्याला जाणीव आहे, पण पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर उत्खनन करण्याची आपली जबाबदारी असल्याचे त्यांना वाटते. तसे गौतम यांनीच म्हटले आहे. ओली यांचा कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असा खुलासा परराष्ट्र मंत्रालयाने केला होता, मात्र रामायणाबाबत आणखी संशोधन व अभ्यास होण्याची गरज असल्याचे ओली यांना सूचित करायचे होते असा युक्तिवादही करण्यात आला होता.

संबंधित बातम्या