नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची स्वतःच्याच पक्षातून हकालपट्टी  

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना कम्युनिस्ट पक्षामधून काढून टाकण्यात आले आहे.

नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना कम्युनिस्ट पक्षामधून काढून टाकण्यात आले आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या अन्य गटाने केपी शर्मा ओली यांचे पक्षातील सदस्यत्व रद्द केले आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या दुसर्‍या गटाचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ यांनी आज याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी पंतप्रधान ओली यांनी पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांना पक्षातील पदावरून दूर केले होते. त्यानंतर गेल्या शुक्रवारी सरकारच्या निषेधार्थ नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रवादी गटातील सदस्यांनी काठमांडूमध्ये मोठा मोर्चा काढला होता. 

नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रवादी गटाने काढलेल्या मोर्चानंतर आता काळजीवाहू पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना कम्युनिस्ट पक्षामधून काढून टाकण्यात आले आहे. तर 22 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या मोर्चात नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी केपी शर्मा ओली जोरदार टीका केली होती. के.पी. शर्मा ओली यांनी असंवैधानिकपणे संसद विघटित केली असून, नेपाळच्या संघ लोकशाही व्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे पुष्प कमल दहल प्रचंड यांनी म्हटले होते. तसेच केपी शर्मा ओली यांच्या या निर्णयामुळे पक्षाच्या कायद्यांचे व कार्यपद्धतींचे उल्लंघन नाही तर नेपाळची राज्यघटना देखील दुर्बल केल्याचे पुष्प कमल दहल प्रचंड यांनी सांगितले होते. याशिवाय माओवाद्यांनी मुख्य प्रवाहातील राजकारणात येण्यासाठीच्या शांतता प्रक्रियेला देखील खीळ बसल्याचा आरोप पुष्प कमल दहल प्रचंड यांनी केपी शर्मा ओली यांच्यावर केला होता. 

केपी शर्मा ओली यांनी संसद भंग करत, 30 एप्रिल आणि 10 मे रोजी मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या होत्या. व यानिर्णयास नेपाळच्या राष्ट्रपतींनी मान्यता दिली होती. तर ओली यांच्या या निर्णयाला पक्षाचे प्रमुख नेते पुष्प कमल दहल प्रचंड यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. त्यामुळे नेपाळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पक्षातील एका गटाचे नेतृत्व केपी शर्मा ओली यांच्याकडे आहे. तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व पुष्प कमल दहल प्रचंड यांच्याकडे आहे.          

संबंधित बातम्या