मेंदूतील चिप करेल आता उपचारांना मदत

पीटीआय
रविवार, 30 ऑगस्ट 2020

डुकरावर पहिला प्रयोग; एलॉन मस्क यांच्या ‘स्टार्टअप’चे संशोधन

न्यूयॉर्क: अवकाशात पहिले खासगी अवकाशयान सोडणारे हरहुन्नरी उद्योजक एलॉन मस्क यांनी आज एका घोषणेद्वारे नवीन क्षेत्राची कवाडे जगासाठी खुली केली आहेत. दोन महिन्यांपासून एक डुकराच्या मेंदूमध्ये नाण्याच्या आकाराची संगणकीय चिप बसवून त्याचे परिणाम अभ्यासल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अशाच प्रकारचे रोपण करून भविष्यात मानवाच्या मेंदूशी संबंधित आजार बरे करता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

एलॉन मस्क यांच्या मेंदूविज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या न्यूरालिंक या स्टार्टअपने हा प्रयोग केला आहे. त्यांनी एका नाण्याच्या आकाराची संगणकीय चिप तयार करून तिला हजारो इलेक्ट्रॉड जोडले होते. याद्वारे मेंदूतील हालचालींचा अभ्यास करता येतो, असा कंपनीचा दावा आहे. या चिपचा आणखी विकास करून त्याचे मानवी मेंदूत रोपण केल्यास अल्झायमर, चक्कर येणे, मणक्याचे आजार आणि मेंदूशी निगडीत अनेक आजारांवर उपचार करणे सोपे जाऊ शकते.  मानवी मेंदूला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यासाठीही या चिपचा वापर करता येईल, असा मस्क यांच्या कंपनीचा दावा आहे. डुकरावर केलेल्या प्रयोगाचा निष्कर्ष अद्याप सांगण्यात आलेला नसला तरी यादृष्टीने सुरू असलेल्या संशोधनाला मस्क यांनी बळ दिले असल्याचे मानले जात आहे. 

संबंधित बातम्या