नव्या आयुष्यासाठी ऑस्ट्रेलियात या

पीटीआय
शुक्रवार, 10 जुलै 2020

स्कॉट मॉरिसह यांचे हाँगकाँगवासीयांना निमंत्रण; हस्तांतर कराराला स्थगिती

मेलबर्न

चीनने हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने हाँगकाँगबरोबर केलेल्या गुन्हेगार हस्तांतर कायद्याला स्थगिती दिली आहे. तसेच, चीनला कंटाळलेल्या आणि नव्याने आयुष्य सुरु करु इच्छिणाऱ्या दहा हजार विद्यार्थी आणि कुशल कामगारांना व्हीसाही पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देऊ केला आहे.
चीन सरकारने गेल्या महिन्यात हाँगकाँगसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी याचा निषेध नोंदविला. या कायद्यानुसार देशद्रोह, फुटीरतावाद, दहशतवाद अशा कारवायांना शिक्षा करण्याचे अधिकार चीन सरकारकडे आल्याने हाँगकाँगच्या स्वायत्ततेला धक्का बसला आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने हाँगकाँग प्रशासनाबरोबर केलेला गुन्हेगार हस्तांतर करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पंतप्रधान मॉरिसन यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, स्थलांतरीतांनी ऑस्ट्रेलियाला सशक्त केले आहे. आम्ही यापूर्वीही जगभरातील लोकांना ऑस्ट्रेलियात येण्याचे आवाहन केले आहे. आताही हाँगकाँगमधून येथे येऊन नव्याने आयुष्य सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी, कुशल कामगार, छोटे उद्योजक यांचे आम्ही स्वागत करू. त्यांच्यासाठी आम्ही नवीन उपाय योजना करू.

हाँगकाँगमध्ये आधी एक देश दोन यंत्रणा असे स्वरुप होते. ते स्वायत्त असल्याने करार करण्यात आला होता. आता हाँगकाँगमधील नव्या कायद्याने परिस्थिती पूर्णपणे बदलली असल्याने हस्तांतर कराराला काहीही अर्थ उरलेला नाही.
- स्कॉट मॉरिसन, ऑस्ट्र्रलियाचे पंतप्रधान

मॉरिसन म्हणाले...
- हाँगकाँगमधील व्यावसायिकांना ऑस्ट्रेलियात येण्यास मदत करणार
- उच्च कौशल्य असणाऱ्यांना प्राधान्याने काम देणार
- ऑस्ट्रेलियामध्ये आधीच आलेल्या हाँगकाँगवासीयांना नवीन व्हीसा देणार
- हाँगकाँगमधून आलेल्यांमुळे ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येईल

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या