इराणने इस्राईलवर हल्ला करावा ; इराणमधील वृत्तपत्राची सरकारला चिथावणी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

इराणमधील अणुसंशोधक मोहसीन फकीरजादे यांच्या हत्येमागे इस्राईलचा हात असल्याचे सिद्ध झाल्यास इस्राईलमधील हैफा शहरावर हल्ला करावा, अशी चिथावणी टोकाच्या विचारसरणीचा प्रचार करणाऱ्या ‘केहान’ या वृत्तपत्रामधून देण्यात आली आहे.

तेहरान : इराणमधील अणुसंशोधक मोहसीन फकीरजादे यांच्या हत्येमागे इस्राईलचा हात असल्याचे सिद्ध झाल्यास इस्राईलमधील हैफा शहरावर हल्ला करावा, अशी चिथावणी टोकाच्या विचारसरणीचा प्रचार करणाऱ्या ‘केहान’ या वृत्तपत्रामधून देण्यात आली आहे. हत्येचा बदला घेताना एखाद्या प्रकल्पावर हल्ला करावा आणि अधिकाधिक जिवीत हानी करावी, असा ‘सल्ला’ही देण्यात आला. 

फकीरजादे यांची शुक्रवारी रात्री हत्या झाली. अमेरिकेबरोबरील वाढलेला तणाव आणि त्यांचे सैन्य आखाती देशांमध्ये असणे यामुळे इराण अस्वस्थ असून या हत्येमुळे तणाव वाढला. या वृत्तपत्रात इराणचे स्तंभलेखक सादुल्ला झारेई यांनी सरकारवरही नाराजी व्यक्त केली. ‘सीरियावरील इस्राईलच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणने केलेल्या कारवाईचा फारसा परिणाम झाला नव्हता. मात्र, हैफावर हल्ला करून मोठ्या संख्येने लोकांना मारल्यास त्याचा निश्‍चितच परिणाम होईल. त्यासाठी हीच वेळ आहे, कारण इस्राईल, अमेरिका हे दोन्ही देश सध्या युद्धाच्या तयारीत नाहीत,’ असे झारेईन सुचविले आहे. 

इराणची संसदही आक्रमक

केहान हे इराणमधील फारसे न चालणारे वृत्तपत्र असले तरी त्याच्या मुख्य संपादकांनी काही काळ देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचे सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. फकीरजादे यांच्या हत्येनंतर इराणच्या संसदेने या मुद्यावर चर्चा केली. इराणच्या शत्रूंना शासन होणे आवश्‍यक आहे, असे मत यावेळी आक्रमकपणे मांडले गेल्याचे संसदेच्या प्रवक्त्याने सांगितले.

संबंधित बातम्या