चीनच्या दाव्यांना आधार नाही

south china sea
south china sea

बीजिंग

दक्षिण चिनी समुद्राबाबतच्या चीनचा कोणताच दावा मंजूर करणार नाही, ही अमेरिकेची जुनी भूमिका आता ऑस्ट्रेलियानेही स्वीकारली आहे. यावरूनच ऑस्ट्रेलिया आणि चीन यांच्यात सध्या ‘ट्वीटर वॉर’ रंगले आहे. दक्षिण चिनी समुद्रातील काही बेटांवर चीन सरकारने सांगितलेल्या दाव्यांना कोणताही कायदेशीत आधार नाही, असे ऑस्ट्रेलियाने नुकतेच संयुक्त राष्ट्रांमध्ये सांगितले आहे. यामुळे चीनने ऑस्ट्रेलियावर जोरदार टीका केली आहे.
चीनबरोबरील संबंध आम्हाला बिघडवायचे नाहीत, असे काही दिवसांपूर्वीच सांगणाऱ्या ऑस्ट्रेलियाने चीनच्या दाव्यांवर शंका व्यक्त करत वादाची ठिणगी टाकली आहे. ‘चीनच्या हालचाली या अस्थिरता निर्माण करणाऱ्या असून यामुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो, असे आपण भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितले आहे,’ असे ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओ’फॅरल यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट केले होते. चीनचे राजदूत सन वेईडोंग यांनी दुसऱ्याच दिवशी त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलिया वास्तव नाकारत असल्याचा आरोप केला. तसेच कोणाला शांतता हवी आणि कोणाला अस्थिरता हवी आहे, हे स्पष्टच आहे, असे म्हणत ऑस्ट्रेलियावरच टीका केली. मात्र, ओ’फॅरल यांनीही, चीनचे अनेक दावे आंतरराष्ट्रीय लवादाने अमान्य केले असून २०१६ मधील या निकालाचा चीनने आदर करावा, असे सुनावले. चीनने हा निकाल सपशेल नाकारला आहे. बॅरी ओ’फॅरल यांच्या उत्तरांना भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला.

बेटांवरील चीनचा ताबा
दक्षिण चिनी समुद्रातील अनेक छोट्या बेटांचा चीनने ताबा घेतलेला आहे. या बेटांवर इतर सहा देशांनीही आपला हक्क सांगितला असला तरी लष्करी सामर्थ्याच्या बळावर चीनने अद्याप कोणालाही धूप घातलेली नाही. या बेटांवर चीनने विमाने उतरण्यासाठी धावपट्ट्या निर्माण केल्या असून लष्करी तळ उभारले आहेत.

अमेरिका-ऑस्ट्रेलिया एकत्र
दक्षिण चिनी सागरातील चीनचे दावे ऑस्ट्रेलियानेही फेटाळल्याने अमेरिकेला एक मोठा जोडीदार मिळाला आहे. या दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्री पातळीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत चीनविरोधातील आघाडी अधिक मजबूत करण्याचा निश्‍चय करण्यात आला आहे. तसेच, दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनीही दक्षिण चिनी समुद्रातील मुक्त स्वातंत्र्याच्या हक्काची घोषणा करत चीनला दाव्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

संपादन - अवित बगळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com