६२ प्रवाशांना घेऊन बुडालेल्या इंडोनेशियाच्या विमानाचे अवशेष सापडले

PTI
सोमवार, 11 जानेवारी 2021

इंडोनेशियाचे बोइंग ७३७-५०० हे प्रवासी विमान  समुद्रात कोसळल्यानंतर काल या विमानाचे काही अवशेष शोध पथकाला सापडले आहेत.

जकार्ता :  इंडोनेशियाचे बोइंग ७३७-५०० हे प्रवासी विमान  समुद्रात कोसळल्यानंतर काल या विमानाचे काही अवशेष शोध पथकाला सापडले आहेत. श्रीविजय एअरलाइन्सचे हे विमान जकार्ता विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले होते. यावेळी विमानात ६२ जण होते. 

विमान कोसळल्याच्या ठिकाणाचा शोध घेत इंडोनेशियाच्या पाणबुड्यांच्या पथकाने शोध घेतला असता, त्यांच्या हाती काही अवशेष लागले, अशी माहिती एअर चीफ मार्शल हादी जाहजांतो यांनी दिली. आज विमानाच्या इंधनाच्या टाकीचा भाग सापडला. काल रात्रीपासून शोध पथकाला याच जागी कपड्यांचे काही तुकडे आणि विमानाच्या बाह्य भागाचे काही अवशेष सापडले आहेत. या अपघातामागील कारण अद्याप समजले नसून प्रवाशांबाबतही काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही. या विमानातील प्रवाशांचा शोध लागावा आणि ते सुखरुप असावेत, अशी मी आशा करतो, अशी प्रतिक्रिया इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी दिली आहे.   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान अपघात झाला त्या आसपासच्या मच्छिमारांनी दुपारी अडीच वाजता मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकला होता. यावेळी प्रचंड पाऊस सुरु होता आणि वातावरणही खराब होते. आजूबाजूचे फारसे काही दिसत नसतानाही आवाज आला त्या ठिकाणाहून समुद्रात उंच पाणी उडाल्याचे दिसल्याचे या मच्छिमारांनी सांगितले.

ब्लॅक बॉक्सची ठिकाणे समजली

कोसळलेल्या विमानातील दोन ब्लॅक बॉक्स जेथे पडले आहेत ती ठिकाणे समजल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वाहतूक सुरक्षा संस्थेचे प्रमुख सोएर्जांतो तिजाहजांतो यांनी ही माहिती दिली. आता लवकरच पाणबुड्यांच्या मदतीने ते वर काढण्यात येतील. या कामास जास्त वेळ लागणार नाही अशी त्यांना आशा आहे. प्रारंभी लष्कराच्या एका नौकेवर कोसळलेल्या विमानातून सिग्नल मिळाला होता.

संबंधित बातम्या