कोणी भीक देता का भीक....म्हणणारी आजी निघाली लाखोंच्या संपत्तीची मालकीन..

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

आपल्याला लखवा(paralysis) झाला असल्याने चालता येत नसून आपले डोळेही अंध असल्याचे सांगत भीक मागणारी इजिप्तमधील ही आजी लखोपती असल्याचे समोर आले आहे.

 कैरो- रेल्वे स्टेशन, बस स्थानक, किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी आपण भिकारी पाहिलेच असतील. त्यांच्या प्रति सहानुभुती व्यक्त करताना आपण सहजच एखादा सुट्टा रुपया त्यांच्या थाळीत फेकून पुढे जातो. मात्र, असा प्रत्येकाच्या खिशातून पैसे काढणारा भिकारी एवढ्या पैशांचे काय करत असेल बरे? याचे उत्तर आपल्याला इजिप्तमध्ये अटक करण्यात आलेल्या भिकारी आजीची संपत्ती पाहून मिळेल.

आपल्याला लखवा(paralysis) झाला असल्याने चालता येत नसून आपले डोळेही अंध असल्याचे सांगत भीक मागणारी इजिप्तमधील ही आजी लखोपती असल्याचे समोर आले आहे. या आजीचे नाव नफीसा असून तिचे वय ५७ वर्षे आहे. तिच्यावर संशय आल्याने पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यात तिच्या बँक खात्यावर ३० लाख इजिप्तशियन पाऊंड्स इतकी रक्कम आढळून आली. तसेच तिच्या नावे पाच इमारतीही असल्याने एवढी संपत्ती बाळगणाऱ्य़ा या आजीला पोलिसांनी तिला अटक केली आहे. 

लखवा झाल्याचे ढोंग करत ही आजी आपल्याला चालता येत नसल्यामुळे भीक मागावी लागत असल्याची व्यथा येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंकडे मांडायची. तसेच आपल्या दृष्टीतही दोष असल्याने आपल्याला दिसत नसल्याचेही सांगत त्यांच्याकडून पैसे उकळायची. गेले कित्येक वर्ष तिचा हा नित्यक्रम सुरू होता. मात्र, आता तिची ही बनवाबनवी पकडली गेली आहे. दिवस संपल्यावर तेथून जाताना तिला असा कोणताही आजार न दिसून आल्याने काही लोकांनी तिचा माग काढत तिची पोलिसात तक्रार दिली.

पोलिसांनी चौकशीसाठी या भिकारी आजीला ताब्यात घेतले असता तिला असा कोणताही आजार नसल्याची कबुली तिने पोलिसांकडे दिली आहे. आपल्या बँक खात्यावर 30 लाख इजिप्तशियन पाऊंड्स तसेच तिच्या नावे पाच इमारतीही असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी तिला अटक करत तिची संपत्ती पब्लिक प्रॉपर्टी म्हणून जाहीर केली आहे.      
 

 

संबंधित बातम्या