चीनविरोधात आणखी एक पाऊल

Dainik Gomantak
शुक्रवार, 3 जुलै 2020

कंपन्यांशी व्यवहार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना अमेरिकेकडून जारी

वॉशिंग्टन

शिनजिआंग प्रांतासह चीनमधील मानवाधिकार भंगाचा आरोप झालेल्या सर्व कंपन्यांशी व्यवहार करण्याबाबत अमेरिकेने त्यांच्याकडील कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चीनविरोधात ट्रम्प प्रशासन कडक उपाय योजत असून त्याचाच भाग म्हणून या सूचना दिल्या गेल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांत चीनची व्यापारकोंडी करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. चीनमधील उईगर मुस्लिमांसाठी मानवाधिकार कायदा करणे आणि हुवेई, झेडटीई या चिनी कंपन्यांना सुरक्षेसाठी धोका म्हणून जाहीर करणे, असे निर्णय ट्रम्प यांनी घेतले आहेत. आज अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयासह अर्थ आणि व्यापार मंत्रालयाने चीनमधील, विशेषत: शिनजिआंग प्रांतामधील कामगारांचे शोषण आणि मानवाधिकार भंगांचा आरोप असणाऱ्या कंपन्यांशी व्यापार करण्याबाबत अमेरिकी कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अमेरिकी कंपन्यांच्या प्रमुखांनी चीनमधील कंपन्यांशी व्यापार करताना त्यात असलेल्या आर्थिक आणि कायदेशीर धोक्यांची जाणीव ठेवावी, असा इशारा देण्यात आला आहे.
हाँगकाँगमध्ये चीनने नवा सुरक्षा कायदा लागू केल्याने अमेरिका नाराज आहे. हा कायदा लागू करण्यास कारणीभूत असणाऱ्या चिनी अधिकाऱ्यांवर अमेरिकेने व्हीसा निर्बंध लागू केले आहेत. तसेच, हाँगकाँग आणि चीनमध्ये संरक्षण साहित्य विकण्यासही अमेरिकेने आपल्या कंपन्यांना मनाई केली आहे.

चीन हा जगातील सर्वांत बंदिस्त देश आहे. त्यांनी हाँगकाँगमध्ये सुरक्षेच्या नावाखाली नवा राक्षसी कायदा आणला आहे. त्यामुळे जगातील सर्वांत स्थिर, समृद्ध असलेला हा देश आता चीनच्या विळख्यात सापडला आहे. येथे आता सर्वत्र संशयाचे ढग आहेत. तिथे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे.
- माइक पॉम्पिओ, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री

संबंधित बातम्या