आजारजन्य चीन...!; कोरोनानंतर आता दुसऱ्या आजाराने पाडले चीनला आजारी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

ब्रुसेलोसिसची लागण झालेल्या रूग्णांमध्ये फ्लू सारखी लक्षणे दिसत असून लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्याने, आजारी प्राण्यांचे मांस खाल्ल्यास किंवा हवेतून श्वासामार्गे शरीरात गेल्याने या आजाराची लागण होते.

बिजिंग- कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर आता चीनमध्ये आणखी एक आजाराचा उद्रेक झाला आहे. ब्रुसेलोसिस नावाच्या जीवाणूजन्य आजाराची 6000 लोकांना लागण झाली आहे. मागील वर्षी एका औषध निर्माण कंपनीच्या प्रयोगशाळेतून संयंत्राच्या लीकेजमुळे हा आजार बाहेर पडला होता.

लान्चोच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गांसुच्या राजधानीमध्ये 6000 लोकांना ब्रुसेलोसिसची लागण झाली आहे. ब्रुसेला या जीवाणूमुळे या आजाराची लागण होत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने शहरातील एकूण ५५,७२५ संशयितांची चाचणी केली असून त्यातील 6000 लोकांना या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. ग्लोबल टाईम्सच्या राज्यातील आवृत्तीने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. 14 सप्टेंबरला रूग्णांची संख्या 3245 इतकी होती. रूग्णांची संख्या दुप्पट झाली असून याकडे सरकार गांभीर्याने  बघत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.              

 जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शिकेनुसार, ब्रुसेलोसिसची लागण झालेल्या रूग्णांमध्ये फ्लू सारखी लक्षणे दिसत असून लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्याने, आजारी प्राण्यांचे मांस खाल्ल्यास किंवा हवेतून श्वासामार्गे शरीरात गेल्याने या आजाराची लागण होते. काही लक्षणे शरीरात कायमस्वरूपी राहत असून ते शरीरासाठी अधिक धोकादायक असतात.    

लान्चोच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मागील वर्षी सप्टेंबरमध्ये 'चायना अॅनिमल हजबेंडरी इंडस्ट्री'मधील एका औषध निर्माण कंपनीतून ब्रुसेला नावाचा विषाणू बाहेर पडला होता. ब्रुसेलोसिसवरील लस तयार करताना या कंपनीने मुदत संपलेले किटकनाशक वापरल्याने जुलै ते ऑगस्ट 2019मध्ये हा जीवाणू प्रदुषित वायू बाहेर पडतात त्या मार्गाने बाहेर पडला. बाहेर पडलेला हा गॅस नंतर हवेत पसरल्याने हवेतून तो लान्चोच्या भागात सर्वत्र गेल्याचे शासकीय तपासाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत म्हटले होते. 

दरम्यान, ही ब्रुसेलोसिसवरील लस निर्माण करणारी कंपनी मागील वर्षीच डिसेंबरमध्ये बंद करण्यात आली असून ऑक्टोबरमध्ये ती जमीनदोस्तही करण्यात आल्याची माहिती ग्लोबल टाईम्सने दिली आहे. 

संबंधित बातम्या