ऑक्सफोर्ड कोविड लस: ॲस्ट्राझेनेका लसीच्या अंतिम चाचण्या स्थगित

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

कंपनीची माहिती; डोस दिल्यानंतर स्वयंसेवक आजारी, चौकशी होणार

न्यूयॉर्क: कोरोना व्हायरसच्या साथीचा जगभरात उद्रेक झाला असताना सर्वांचे लक्ष लसीकडे लागले आहे. अशा वेळी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने तयार होत असलेल्या लसीच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्याचे ॲस्ट्राझेनेकाच्या कंपनीने मंगळवारी (ता. ८) जाहीर केले. 

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चाचण्यांदरम्यान लस दिलेली एक स्वयंसेवक अचानक आजारी पडल्याने आम्ही चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही एक सामान्य घटना आहे. लसीच्या डोसाचा दुष्परिणाम म्हणून या व्यक्तीला त्रास झाला का, याची चौकशी सुरू आहे. तसेच, लसीच्या सुरक्षिततेची तपासणी करण्यासाठी चाचणीला स्थगिती दिली असून, त्याचे निष्कर्ष आल्यानंतर चाचण्या पुढे सुरू करण्यात येईल. मात्र, या लसीच्या संभाव्य दुष्परिणामांची माहिती ॲस्ट्राझेनेकाने दिलेली नाही.

ब्रिटनमध्येही चाचण्या
‘स्टेट’ या आरोग्यविषयक वृत्तस्थळाने चाचण्या थांबविल्याचे वृत्त प्रथम दिले. ब्रिटनमध्ये लसीचे संभाव्य दुष्परिणाम दिसून आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने याला दुजोरा दिला असून, अमेरिकेत आणि अन्य देशांत अभ्यासासाठी लसीच्या चाचण्या स्थगित केल्याचे स्पष्ट केले. गेल्या महिन्यात ॲस्ट्राझेनेकाने लसीच्या व्यापक चाचण्यांसाठी अमेरिकेत ३० हजार लोकांची निवड करण्यास सुरुवात केली होती. ब्रिटनमधील लोकांनाही ही लस टोचण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतही काही प्रमाणात अभ्यास सुरू आहे. 

अन्य लस निर्माते सावध
अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनावर नऊ लशी विकसित होत आहे. ॲस्ट्राझेनेका लशीच्या चाचणीमध्ये अडथळा आल्यानंतर या लशींचे निर्माते सावध झाले आहेत. कोरोनाच्या साथीला प्रतिबंध घालण्यासाठी लस निर्मिती अत्यावश्‍यक असली तरी लशीच्या प्रायोगिक तत्त्वावरील चाचण्यांसाठी आवश्‍यक शास्त्रीय सुरक्षा आणि परिणामांच्या मानकांचे पालन करण्याचा निश्‍चय लस निर्मात्यांनी केला आहे.

ॲस्ट्राझेनेकाचा प्रवक्ता म्हणाला...

  •     मोठ्या प्रमाणावरील चाचण्यांमध्ये त्रास होण्याची शक्यता
  •     विपरीत परिणामांची स्वतंत्रपणे मीमांसा आवश्‍यक
  •     लसीचे गंभीर परिणाम वेगवेगळ्या स्वरूपात उद्‌भवू शकतात
  •     रुग्णालयात दाखल होणे, गंभीर आजार जडणे आणि मृत्यूचा धोका यांचाही यात समावेश होऊ शकतो.

संबंधित बातम्या