चीन आणि पाक तोंडघशी

PTI
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

काश्‍मीर मुद्दा ‘आंतरराष्ट्रीय’ करण्याचा सुरक्षा परिषदेतील प्रयत्न फसला

न्यूयॉर्क

काश्‍मीरच्या मुद्याला आंतरराष्ट्रीय स्वरुप देण्याचा पाकिस्तान आणि चीनचा प्रयत्न साफ अयशस्वी ठरला आहे. काश्‍मीरच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बोलाविलेली बैठक कोणत्याही निष्पन्नाविना संपल्याने हे दोन्ही देश तोंडघशी पडल्याचे भारताचे ‘यूएन’मधील राजदूत टी. एस. तिरुमूर्ती यांनी आज सांगितले.
भारताने कलम ३७० रद्द केल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशीच चीनने काल (ता. ५) काश्‍मीरच्या मुद्यावरुन सुरक्षा परिषदेची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पाकिस्तानने भारताच्या काश्‍मीरच्या विभाजनाविरोधात आणि विशेष दर्जा काढून घेण्याविरोधात इतर देशांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते साफ अपयशी ठरले. तिरुमूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्‍मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील द्वीपक्षीय चर्चेचा मुद्दा असल्यावर सुरक्षा परिषदेतील बहुतेक देशांनी एकमत व्यक्त करत सिमला कराराचे महत्त्व अधोरेखित केले. पाकिस्तानला अमेरिकेने सर्वप्रथम विरोध करताना, हा मुद्दा द्वीपक्षीय असून आंतरराष्ट्रीय परिषदेने यासाठी वेळ घालविण्याची गरज नाही, असे स्पष्ट सांगितले. इतर देशांनीही अमेरिकेच्या या मुद्याला पाठिंबा दर्शविला. तसेच, कलम ३७० रद्द करणे ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे भारताने या बैठकीत स्पष्ट करतानाच पाकिस्ताला वास्तव स्वीकारुन भारतविरोधी प्रचार थांबविण्याचा सल्ला दिला.
जानेवारी महिन्यातही चीनने अशाच प्रकारे बैठक बोलावून काश्‍मीरप्रश्‍नी पाकिस्तानला साथ देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही हे दोन्ही देश एकटे पडले होते. ‘पाकिस्तानकडून असा प्रयत्न होणे हे नवे नाही. खोटे शंभर वेळा सांगितले तरी ते खरे होत नाही, हे त्यांना कळायला हवे,’ असे टी. एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले.

काश्‍मीर मुद्यावर एकही बैठक नाही
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी, काश्‍मीरप्रश्‍नी सुरक्षा परिषदेत तीन वेळा बैठक झाल्याचा दावा केला होता. हा दावा टी. एस. तिरुमूर्ती यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले की, आतापर्यंत या प्रश्‍नावर तीन वेळा तर सोडाच, एकदाही अधिकृत बैठक झालेली नाही. आतापर्यंत झालेल्या चर्चा या ‘इतर कोणताही विषय’ या सत्रात झाल्या असून त्या अनधिकृत असतात, त्याची नोंद ठेवली जात नाही.

अयशस्वी प्रयत्नांमधून
योग्य निष्कर्ष काढावा

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नाला साथ दिल्याबद्दल भारताने चीनला फटकारले आहे. अशा प्रकारच्या अयशस्वी प्रयत्नांमधून चीनने योग्य तो निष्कर्ष काढावा, असा सल्ला देतानाच परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप सहन न करण्याचा इशारा दिला आहे.
सुरक्षा परिषदेत काश्‍मीरच्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी चीनने काल (ता. ५) बैठक बोलाविली होती, त्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी कालच याबाबत नाराजी व्यक्त करत भारताची भूमिका स्पष्ट केली होती. जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या घटनेला काल एक वर्ष पूर्ण झाले, त्याच दिवशी पाकिस्तानने काश्‍मीरचा मुद्दा सुरक्षा परिषदेत उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या या हस्तक्षेपाला विरोध केला. ‘भारताचा भूभाग असलेल्या जम्मू-काश्‍मीरबाबत चीनने सुरक्षा परिषदेत चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. भारताच्या या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करण्याचा चीनचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही. त्यांच्या आधीच्या प्रयत्नांप्रमाणेच यावेळी आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. चीनच्या अशा प्रकारच्या हस्तक्षेपाला आमचा ठाम विरोध असून त्यांनीही अपयशी प्रयत्नांमधून योग्य तो धडा घ्यावा,’ असे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संपादन -अवित बगळे

संबंधित बातम्या