सहा महिन्यानंतर चित्रपट झळकणार

PTI
शुक्रवार, 24 जुलै 2020

बीजिंग सज्ज; तीस टक्केच श्रोत्यांना परवानगी मिळणार

बीजिंग

कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू ठरलेल्या चीनची राजधानी बीजिंग आता चित्रपटगृहे सुरू करण्यास सज्ज झाली आहे. राजधानीतील कमी जोखमीच्या भागात उद्या (ता. २४) पासून चित्रपटगृहे सुरू होणार असून एकावेळी केवळ ३० टक्के श्रोत्यांना चित्रपट पाहता येणार आहे. अर्थात या वेळी सोशल डिस्टिन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.
राजधानी बीजिंगमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून ते मंगळवार दुपारपर्यंत स्थानिक संक्रमणाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. या आधारावर राजधानीतील सर्व भागात कोरेाना संसर्गाचा प्रभाव कमी झाला असल्याचे गृहित धरले जात आहे, असे आरोग्य अधिकाऱ्याने म्हटले आहे. बीजिंग शहरात एकूण २६२ चित्रपटगृहे आहेत. परंतु कोविड-१९ चा उद्रेक झाल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ही थिएटर आजतागायत बंद ठेवण्यात आले. यासंदर्भात महानगरपालिकेचे अधिकारी वँग जिएक्वान यांनी पत्रकार परिषद घेऊन काही अटींवर चित्रपटगृहचालकांना परवानगी दिली जात असल्याचे सांगितले. येत्या शुक्रवारपासून चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत इच्छा बाळगून असलेले मालक बीजिंग फिल्म ब्युरोकडे अहवाल देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सोशल डिस्टिन्सिंगचे पालन
बीजिंग शहर प्रशासनाने चित्रपटगृहांसाठी नियमावली तयार केली आहे. त्या त्या भागातील कोरोना संसर्गाची स्थिती आणि लॉकडाउनचे नियम लक्षात घेता चित्रपटगृहे सोयीनुसार चित्रपटाचा वेळ निर्धारित करु शकतील, असे निवेदनात म्हटले आहे. चित्रपटगृहातील उपस्थिती एकूण क्षमतेच्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. दोन चित्रपटांमधील वेळ दीड तास असावा आणि त्या काळात चित्रपटगृहाचे सॅनेटायजेशन करणे गरजेचे आहे. मल्टीप्लेक्समध्ये निम्मेच पडदे सुरू ठेवणे, अशा प्रकारच्या अटी घालण्यात आल्या आहेत.
श्रोत्यांची तपासणी आणि ऑनलाइन तिकीट
थिएटरमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक श्रोत्याची थर्मल स्क्रिनिंग केली जाणार आहे. दोन श्रोत्यांमध्ये एक मीटर अंतर असणे गरजेचे आहे. चित्रपटाचे तिकीट ऑनलाइनवर उपलब्ध असून चित्रपटगृहात एकमेकांशी संपर्क येणार नाही, अशी व्यवस्था करावी, अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या शुक्रवारी बीजिंग शहरात नऊ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. दरम्यान, कोविड-१९ चा कमी संसर्ग असलेल्या प्रदेशात चित्रपटगृहे सुरू झाली असून मंगळवारी राष्ट्रीय पातळीवर बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन ६४५, ००० डॉलर होते. हे कलेक्शन सोमवारच्या तुलनेत (५०१,००० डॉलर ) अधिक होते.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या