म्यानमारमध्ये आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट गोळीबार; 18 जण ठार, कित्येक जखमी

म्यानमारमध्ये आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट गोळीबार; 18 जण ठार, कित्येक जखमी
mynmar

म्यानमार मधील सत्तापालटानंतर देशाच्या विविध भागात प्रदर्शन करत असलेल्यांवर पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. व या गोळीबारात 18 लोक ठार आणि 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचे समजते. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रात सैन्याविरोधात आवाज उठविणार्‍या म्यानमारचे राजदूत क्याव मो तुन यांना बरखास्त करण्यात आले आहे. क्याव मो तुन यांनी देशात लष्करी राजवटीविरूद्ध कठोर कारवाईची मागणी करत जागतिक समुदायाने लोकशाही व्यवस्था पूर्ववत करण्याची विनंती केली होती. 

म्यानमार मध्ये लष्कराने सत्ता हाती घेतल्यानंतर देशाच्या सर्वोच्च नेत्या ऑंग सॅन सू की याना अटक केली होती. आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन करण्यास सुरवात झाली होती. नोव्हेंबरच्या निवडणुकीत सू यांच्या पक्षाने विजय मिळविला होता. मात्र त्याचवेळी लष्कराने निवडणुकीत हेरफार झाल्याचे म्हणत निकाल स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज देशाच्या यंगून शहरासह विविध भागात लोकशाही समर्थकांनी रस्त्यावर उतरून लष्कराच्या बंडखोरी विरोधात निदर्शने केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी स्टेन ग्रेनेड, अश्रुधुराचे गोले आणि हवेत गोळीबार केला. व यानंतर देखील आंदोलन थांबले नसल्याने पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला.  

याशिवाय, यंगूनमध्येच शिक्षकांच्या आंदोलनावर पोलिसांनी स्टेन ग्रेनेडचा वापर केला. त्यामुळे एका महिला शिक्षिकेला हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच यंगूनच्या अन्य भागात पोलिसांच्या गोळीबारात तीन जण ठार झाले असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. त्यानंतर मंडाले येथे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त, यंगून मेडिकल स्कूलबाहेर देखील पोलिसांनी स्टेन ग्रेनेडचा वापर केला असल्याचे समजते. डॉक्टरांच्या ‘व्हाइटकोट अलायन्स ऑफ मेडिक्स’ या संस्थेने पन्नासहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना अटक केली असल्याची माहिती दिली आहे. लष्कराच्या बंडखोरीनंतर सुरु झालेल्या विरोध प्रदर्शनात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.    

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com