
Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिस त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले आहेत. पोलीस त्यांना केव्हाही अटक करु शकतात. यावेळी इम्रान खान यांच्या समर्थकांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली.
पाकिस्तानची वृत्तसंस्था डॉनने दिलेल्या माहितीनुसार, बख्तरबंद पोलिसांचे एक पथक इम्रान यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले असून ते त्यांना कधीही अटक करु शकतात.
तोशाखाना प्रकरणात इम्रान यांच्यावर आधीच न्यायालयात खटला चालवला जात आहे. आता त्यांच्यावर महिला न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी करत त्यांना अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
पीटीआयचे वरिष्ठ नेते फारुख हबीब यांनी पत्रकारांना सांगितले की, काहीही झाले तरी इम्रान खान हे बनावट खटल्यांमध्ये पोलिसांना शरण जाणार नाहीत.
हबीब म्हणाले की, “महिला न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आज अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे. पोलिस आता कोणते नवीन वॉरंट घेऊन आले आहेत ते आम्ही पाहणार आहोत.”
इस्लामाबाद पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तोशाखाना प्रकरणात खान यांना अटक करण्यासाठी आमची टीम येथे पोहोचली आहे.
एकीकडे शाहबाज शरीफ सरकार इम्रान खान यांना तुरुंगात टाकण्याचा घाट घालत आहे, मात्र, माजी पंतप्रधानांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी लाहोरमध्ये मोठी सभा घेऊन न्यायव्यवस्थेवर तसेच सरकारवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला.
दरम्यान, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांनी येत्या रविवारी आणखी मोठी रॅली आयोजित करण्याची घोषणा केली आहे.
या कार्यक्रमानुसार 19 मार्च रोजी लाहोरमधील (Lahore) मिनार-ए-पाकिस्तानसमोर ऐतिहासिक' रॅली काढण्यात येणार आहे.
दुसरीकडे, इम्रान खान यांना दोन प्रकरणात अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यापैकी एक प्रकरण न्यायाधीशांना धमकावल्याचे आहे.
तर दुसरे तोशाखाना प्रकरण आहे, ज्यामध्ये इम्रान यांनी पंतप्रधान म्हणून मिळालेल्या भेटवस्तू विकल्याचा आरोप आहे.
इस्लामाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी खानविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
तसेच, इम्रान खान न्यायाधीशांना धमकावणे आणि तोशाखाना प्रकरणात वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्याचे टाळत आहेत.
वैयक्तिक हजेरीतून सूट मिळावी यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र इस्लामाबादच्या दिवाणी न्यायाधीशांनी ही याचिका फेटाळून लावली आहे.
शिवाय, न्यायाधीशांनी पोलिसांना इम्रान यांना 29 मार्चपूर्वी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर इस्लामाबाद पोलिसांचे एक पथक लाहोरला पाठवण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.