भारतीय वोटर्ससाठी रिपब्लिकन ने चालविली ‘हाउडी मोदी'’ आणि ‘नमस्ते ट्रंप’ च्या क्लिप्स

पीटीआय
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

ट्रम्प यांचे ‘हाउडी मोदी’, तर बिडेन यांच्या गणेशोत्सवासाठी शुभेच्छा

वॉशिंग्टन: अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत भारतीय वंशाच्या नागरिकांना बराच भाव आला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने कमला हॅरिस यांना थेट उपाध्यक्षपदाची संधी देत भारतीयांना खूश  केले, तर आता रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचार व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा वापर केला आहे.

अमेरिकेत मतदानास पात्र असणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या जवळपास पंचवीस लाख आहे. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रयत्न सुरु केले आहेत. ट्रम्प यांची उमेदवार म्हणून या आठवड्यात अधिकृत घोषणा होणार आहे. मात्र, त्यांनी आपली प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरवात केली आहे. आज त्यांच्या प्रचार मोहिमेचा पहिला व्हिडिओ प्रसिद्ध झाला. ‘आणखी चार वर्षे’ असे नाव असलेल्या या व्हिडिओची सुरवातच ‘हाउडी मोदी’ या मागच्या वर्षी अमेरिकेत झालेल्या कार्यक्रमातील मोदींच्या भाषणाने होते. या भाषणात मोदी हे ट्रम्प यांची स्तुती करत आहेत. मोदींच्या या कार्यक्रमाला विक्रमी संख्येने भारतीय उपस्थित होते आणि या कार्यक्रमाची जगभरात चर्चा झाली होती. ट्रम्प यांच्या या व्हिडिओत या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी केलेल्या भारत दौऱ्याचीही दृश्‍ये आहेत. अमेरिकेचे भारताबरोबर अत्यंत चांगले संबंध आहेत आणि आमच्या प्रचारसभांना भारतीयांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे, असे ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेतील एका पदाधिकाऱ्याने सांगितले. कमला हॅरिस यांची निवड करून डेमोक्रॅटिक पक्षाने भारतीयांची मते जिंकल्यामुळेच ट्रम्प यांच्या व्हिडिओमध्ये भारतीयांची मने जिंकण्याचा प्रयत्न झाला असल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले. 

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन आणि ‘रनिंग मेट’ कमला हॅरिस यांनी भारतीयांना गणेशोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हा उत्सव साजरा करणाऱ्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होवो,’ अशी सदिच्छा बिडेन यांनी दिली आहे. त्यांच्या प्रचार मोहिमेतही वारंवार भारतीयांच्या योगदानाचे कौतुक केले जात आहे. पुढील काही दिवसांत भारतीयांना आकर्षित करण्यासाठी बॉलिवूड-स्टाइल व्हिडिओ प्रसिद्ध करण्याचा या पक्षाचा विचार आहे.

व्हिडिओ ट्वीटरवर लोकप्रिय
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराचा व्हिडिओ प्रसिद्ध होताच एका तासात ट्वीटरवर ६६ हजार जणांनी तो पाहिला. ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प (ज्यु.) हे प्रचार मोहिमेचे प्रमुख असून ते अमेरिकी भारतीयांच्या गटांशी जवळीक साधून आहेत. त्यांनीही हा व्हिडिओ रिट्वीट केला. येथील भारतीयांमध्ये मोदी लोकप्रिय आहेत. त्याचा फायदा ट्रम्प उठवत असल्याचे दिसून येत आहे.

हिंदू मतांसाठी आघाडी
रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही प्रमुख पक्षांना भारतीयांच्या मतशक्तीची जाणीव आहे. हे लक्षात घेऊनच त्यांनी प्रचार मोहिम आखली आहे. भारतीयांचा आपल्यालाच पाठिंबा असल्याचा दावा दोन्ही पक्ष करत आहेत. त्यांनी विविध गटांशी हातमिळवणीही केली आहे. अध्यक्षीय निवडणूकीत प्रथमच हिंदू मतांसाठी अशी आघाडी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या