रिपब्लिकन सदस्यांचा ट्रम्पविरोध मावळतोय

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

कॅपिटॉलवर हल्ला झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करणारे अनेक रिपब्लिकन नेते आता महाभियोगाच्या विरोधात मत व्यक्त करत आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सिनेटमध्ये महाभियोगाचा खटला सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या ठरावाला रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांचा विरोध होताना दिसत आहे. कॅपिटॉलवर हल्ला झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करणारे अनेक रिपब्लिकन नेते आता महाभियोगाच्या विरोधात मत व्यक्त करत आहेत. त्यामुळे कॅपिटॉलवरील हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा ट्रम्प यांच्यावरील आरोप सिद्ध होण्याची शक्यता धूसर होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील आरोप सिनेटमध्ये मांडले जाणार आहेत.

लोकप्रतिनिधीगृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत असल्याने हा ठराव मंजूर झाला. मात्र सिनेटमध्ये ठराव मंजूर होण्यासाठी दोन तृतियांश मतांची आवश्‍यकता असते. सध्या सिनेटमध्ये दोन्ही पक्षांची समसमान 50 मते असून सिनेट अध्यक्ष असलेल्या कमला हॅरिस यांचे एक मत धरले तरीही दोन तृतियांश मते होत नाहीत. 6 जानेवारीच्या हिंसाचारानंतर ट्रम्प यांच्यावर टीका करणाऱ्या अनेक रिपब्लिकन नेत्यांवरच डेमोक्रॅटिक पक्षाचा भरवसा आहे.

आता सत्तांतर झाल्याने आणि घटनेला काही दिवस उलटून गेल्याने रिपब्लिकन नेत्यांचा ट्रम्पविरोध मावळत असून ते या प्रक्रियेला विरोध करत आहेत. दोन वेळेस महाभियोगाला सामोरे जावे लागणारे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत. सिनेटमध्ये ठराव सादर झाल्यानंतर पुढील महिन्यात आठ फेब्रुवारीपासून त्यावर सुनावणी सुरु होणार आहे. 

संबंधित बातम्या