रशियाचे सर्वेसर्वा पुतीनना भक्कम कौल

Dainik Gomantak
शुक्रवार, 3 जुलै 2020

"इनिंग' वाढविण्यासाठी घटनाबदलावर शिक्कामोर्तब

मॉस्को

सध्याचा कार्यकाळ चार वर्षांनी संपल्यानंतर प्रत्येकी सहा असे दोन कार्यकाळ मिळून आणखी एक तप रशियाच्या अध्यक्षपदी राहण्याची संधी व्लादिमीर पुतीन यांना मिळू शकेल. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या घटनाबदलास जनमताचा भक्कम पाठिंबा मिळाला, मात्र मतदारांवर दडपण आणले गेल्याचा विरोधक तसेच राजकीय टीकाकारांनी केला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पुतीन यांच्यासाठी अनुकुल कौल मिळाल्याचे जाहीर केले.

टक्केवारीत मतदान
एकूण मतदान ः 65 टक्के
पाठिंबा ः 77.9 टक्के
विरोध ः 21.3 टक्के

काळ संपताच "रिसेट मोड'
- पुतीन यांचा कार्यकाळ 2024 मध्ये संपेल तेव्हा घटनाबदलानुसार "रिसेट मोड' लागू होईल आणि हा कार्यकाळ "शून्य' होईल. त्यामुळे पुतीन पुन्हा सलग दोन कार्यकाळ अध्यक्षपदासाठी प्रयत्न करू शकतील.

महत्त्वाच्या नोंदी
- संसदेच्या दोन्ही सभागृहांत यापूर्वीच घटनाबदलास मंजुरी
- घटनाबदल कायदेशीरदृष्ट्या वैध ठरण्यासाठी जनमताचा पाठिंबा आवश्‍यक अशी पुतीन यांची भूमिका
- एप्रिलमधील नियोजीत मतदान कोरोनामुळे लांबले
- एका आठवड्याच्या टप्यात मतदान
- गेल्या गुरवारपासून बुधवारपर्यंतचा कालावधी
- नव्या घटनेच्या प्रती पूर्ण आठवडाभर पुस्तकांच्या दुकानांत उपलब्ध
- अनेक भागांत 90 टक्‍क्‍यापेक्षा जास्त पाठिंबा
- 2014 मध्ये युक्रेनच्या ताब्यातून मिळविलेल्या क्रिमीयात भरघोस पसंती
- उत्तर कॉकेशस प्रांतातील चेचन्या व सैरेबियातील तुवा येथेहे हेच चित्र
- आर्क्‍टीक विभागातील नेनेट्‌समध्ये विरोधात कौल
- अमेरिकेतील नागरिकांचे न्यूयॉर्कमधील रशियन वकीलातीत मतदान
- तेथे एकूण 816 मतांची नोंदणी; 505 विरोधात-310 जण बाजूने
- मॉस्कोत 65; तर सेंट पीटर्सबर्गमध्ये 77.6 टक्के पाठिंबा
- पश्‍चिमेकडील कालीनीनग्राडमधील मतदान केंद्र सायंकाळी सहा वाजता बंद होण्यापूर्वीच प्राथमिक निकाल जाहीर

पुतीन काय म्हणतात?
पुतीन सध्या 67 वर्षांचे आहेत. 2024 मध्ये सध्याचा कार्यकाळ संपेल तेव्हा ते 71 वर्षांचे असतील. त्यानंतर आपण अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लढवू, पण तशी संधी
मिळण्याचा पर्याय असणे महत्त्वाचे आहे. मतदानाची सांगता नजिक आली असताना पुतीन यांनी देशप्रेमाची साद घातली होती. कोरोनाची जागतिक साथ पसरली असतानाही त्यांनी मतदान घेतले आणि त्याआधी "विजय दिन' आयोजित केला. दुसऱ्या महायुद्धातील विजयाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा सोहळा होता. मे मधील सोहळा पुढे ढकलावा लागला तरी नंतर तो धडाक्‍यात साजरा करून त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. घटनाबदल राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्‍यक असल्याचा पुतीन यांचा व त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.

घटनेत तब्बल 200 बदल
- आधीच्या तरतुदींत अनेक बदल
- अनेक नव्या तरतुदींचा समावेश
- पुराणमतदावी विचारसरणीचे प्रवर्तन, सामाजिक कल्याण व व्यक्ती तसेच संस्थात्मक आदेश
- रशियन प्रांतातील भूभाग बळकावण्याच्या हेतूने कोणत्याही कृतीला बंदी
- समलिंगी विवाहाला बंदी
- विवाह म्हणजे पुरुष व महिला यांचे मिलन अशी घटनेची व्याख्या
- वरिष्ठ अधिकाऱ्यांना परदेशी पासपोर्ट, परदेशात निवासस्थान किंवा बॅंक खाते काढण्याच मनाई
- किमान निर्वाह उत्पन्नापेक्षा किमान वेतन कमी नसणार
- निवत्तीवेतन एकूण राष्ट्रीय निर्देशांकावर आधारीत
- प्राण्यांच्या बाबतीत जबाबदार दृष्टिकोन

जल्लोष नव्हे निर्बंध
रशियात मतदान केंद्रांवर संगीत, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, मनोरंजनाची पर्वणी अशी रेलचेल असते. कोरोनामुळे मात्र हे चित्र बदलले होते. केंद्राच्या दरवाजापाशी तापमान तपासणी, कर्मचाऱ्यांकडून मास्कचे वाटप असे उपाय अवलंबिण्यात आले होते.

देखरेख संस्थेचे ताशेरे
मतदान संपण्यापूर्वीच संरक्षण मंत्रालयाच्या सुत्रांनी निकालावर परिणाम होईल असा कोणताही गैरप्रकार किंवा नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे जाहीर केले. "गोलोस' या स्वतंत्र देखरेख संस्थेने मात्र आपल्याकडे संभाव्य उल्लंघनाच्या सुमारे एकवीसशे तक्रारी आल्याचे सांगितले. घटनाबदलाच्या विरोधात मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथे निदर्शने झाली.

विरोधकांचा आक्षेप
- पुतीन यांचा अध्यक्षपदी अजन्म राहण्याचा इरादा
- मतदानाची स्वतंत्र छाननी नाही
- अवाढव्य पसरलेल्या आणि तब्बल 11 "टाईम झोन' असलेल्या देशात मतदान प्रक्रियेत गैरप्रकार
- कोरोनाच्या नावाखाली मतदान मुद्दाम आठवडाभर चालविले
- मतदानावर लक्ष ठेवणे आणखी अवघड ठरावे हाच यामागील उद्देश

या मतदानाचा कौल म्हणजे जबरदस्त मोठे असत्य होय. जनमताचा खरा कौल त्यातून प्रदर्शित होत नाही.
- ऍलेक्‍सी नॅवाल्नी, नामवंत राजकीय विश्‍लेषक
 

संबंधित बातम्या