रशियाने आणली पहिली लस

PTI
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

अध्यक्ष पुतीन यांची घोषणा; स्वतःच्या मुलींना टोचली लस

मॉस्को

संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनाव्हायरसला पायबंद घालण्यासाठी जगभरातील लसींवर अद्याप संशोधन सुरू असताना रशियाने कोरोनावरील जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा मंगळवारी केला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ही माहिती जाहीर केली. माझ्या मुलींनाही ही लस टोचली आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुतीन यांनी त्यांच्या मंत्र्यांसह आज व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. त्यात ते म्हणाले, ‘‘आज सकाळी जगात पहिल्यांदाच कोरोनाव्हायरसवरील लसीची नोंदणी झाली. जगातील ही पहिली लस असून हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. या लसीच्या आवश्‍यक त्या सर्व चाचण्या झाल्या असून त्यात लस सुरक्षित व प्रभावी असल्याचे निष्‍पन्न झाले आहे. रशियात तयार झालेल्या कोरोना लसीवर आरोग्य मंत्रालयाने मंजुरीची मोहोर उमटविली आहे. आता ही लस मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी पाठविली जाईल.’’ या लसीच्या संशोधनात काम करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत. रशियातील ही पहिली लस ‘गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूट’ आणि रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे तयार केली आहे.

पुतीन कन्यांना पहिले लसीकरण
पुतीन यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या दोन्ही मुलींना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्या दोघींची प्रकृती सुधारत असून त्यांच्यावर लसीचे कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत.

सर्वांत आधी मिळणार लस कोणाला?
रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्‍को म्हणाले की, देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना या महिन्यापासूनच लस देण्यात सुरुवात होऊ शकते. आरोग्य क्षेत्रात आघाडीवर राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वांत आधी लस टोचली जाईल. त्यानंतर ज्‍येष्ठ नागरिकांना प्राधान्य असेल.

बाजारात लसीची उपलब्धता
सध्या ही लस मर्यादित प्रमाणात तयार केली आहे. लसीला नियामक मान्यता मिळालेली असून औद्योगिक पातळीवर सप्टेंबरपासून सुरू होईल तर ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात उत्‍पादन सुरू होईल, अशी माहिती मुराश्‍को यांनी दिली.

लसीविषयी शंका
कोरोनावरील या लसीचा पुरवठा जगभर करण्यात येणार असल्याचे रशियाने म्हटले असले तरी अनेक देशांनी लसीबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. जास्तीत जास्त चाचण्यांशिवाय लसीचा पुरवठा करणे योग्य ठरणार नाही, असे मत पाश्‍चिमात्य देशांसह जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) व्यक्त केले आहे. रशियाची ही लस देशवासियांना देणार नसल्याचे ब्रिटनने स्पष्ट केले आहे. यामुळे सुरुवातीच्या टप्‍प्यात रशियाच्या जनतेवर लसीचा परिणाम पाहून मगच अन्य देश त्‍यावर निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लसीची किंमत
रशियाची वृत्तसंस्था ‘तास’ने दिलेल्या माहितीनुसार रशियात ही लस मोफत उपलब्ध असेल. लसीवर होणाऱ्या खर्चासाठी देशाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. इतर देशांसाठी लसीच्या किंमतीविषयी कोणताही उल्लेख केलेला नाही.

संशोधकांनी स्वतःला टोचली लस
ताप, घसा खवखवणे, न्यूमोनिया आदी अनेक आजारांना निमंत्रण ठरणाऱ्या एडनोव्हायरसचा आधार घेत ‘गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूट’ ने कोरोनावरील ही लस तयार केली आहे. या लसीत ज्या कणांचा वापर केला आहेत, ते कण स्वतःची प्रतिकृती करू शकत नाहीत,असा दावा संशोधकांनी केला आहे. संशोधन आणि उत्पादनात सहभागी झालेल्या काही जणांनी ही लस स्वतःला टोचून घेतली आहे. लस दिल्यावर काही जणांना ताप येऊ शकतो. त्यावर पॅरासिटीमॉलचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जगभरात चाचण्या सुरू
कोरोनावरील पहिली लस तयार केल्याचा दावा रशियाने आज केला असला तरी जगात अन्यत्र लसीवरील चाचण्या सुरू आहेत. अमेरिका, ब्रिटन, चीन, भारत, जपान, ईस्त्राइलसह अनेक देशांमध्ये लसीच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. पाच लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असून त्याचे परिणाम ऑक्टोबरपर्यंत येण्याची शक्यता आहे.

लसीला रशियातूनच विरोध
रशियाने ही लस तयार करण्यात घाई केली असून ती सामान्य नागरिकांना टोचण्यास विरोध होत आहे. रशियातील बहुराष्ट्रीय औषधनिर्माण कंपनीच्या ‘असोसिएशन ऑफ क्लिनिकल ट्रायल्‍स ऑर्गनाझेशन’ या स्थानिक संघटनेने त्यावर आक्षेप घेतला आहे. लसीच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण होण्याआधीच त्याच्या सार्वजनिक वापर करणे धोकादायक असल्याचे सांगितले असून रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्‍को यांना तसे पत्र लिहिले आहे. मानवी चाचणीत ही लस आतापर्यंत १०० पेक्षा कमी लोकांनी दिलेली असता तिचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे धोकादायक ठरू शकते, असे पत्रात म्हटले आहे.

‘मी स्वतः लस टोचून घेईन’
ही लस स्वतः टोचून घेण्याचे रशियाचे आवाहन विश्‍वास व कृतज्ञता म्हणून मी स्वीकारले असल्याचे फिलिपाइन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्टी यांनी स्पष्ट केले. ही लस मिळाल्यावर मी नागरिकांसमोर ती टोचून घेईल. माझ्यावर पहिला प्रयोग करण्यास माझी हरकत नाही, असे त्यांनी सांगितले.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या