रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' लसीची पहिली खेप भारतात दाखल

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 1 मे 2021

स्पुटनिक व्ही लसीची परिणामकारकता 92 टक्के एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशात कोरोना संसर्ग पुन्हा (Corona Second Wave) एकदा वाढू लागला असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियातून (Russia) 'स्पुटनिक व्ही' (Sputnik V) लसीची पहिली खेप भारतात पोहचली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण मोहिमेला आता वेग येणार आहे. आजपासून देशात 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र देशात काही ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक अडथळे येत आहेत. अशातच स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप अखेर भारतात दाखल झाली आहे. (Russia launches first batch of Sputnik V vaccine in India)

सध्या देशात सीरम इन्स्टिट्यूटची कोवीशिल्ड (Covishield) आणि भारत बायोटेकने बनवलेली कोव्हॅक्सिन (Covaxin) लस वापरली जात आहे. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीसोबत भारतामध्ये आता तिसरी लस उपलब्ध होणार आहे. भारतामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्य़ेत प्रचंड वाढ झाली आहे. स्पुटनिक व्ही लसीची परिणामकारकता 92 टक्के एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतात 18 वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणासाठी कोणकोणत्या लसी वापरल्या जाताय?

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. या चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी पुतीन यांचे आभार मानले होते. त्याचबरोबर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधाविषयी मंत्री स्तरावर चर्चा सुरु करण्याचा निर्णय झाल्याचं देखील सांगितलं होतं.

भारतामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशात ऑक्सिजन (Oxygen), रेमडिसिव्हीर (Remdisivir), कोरोना लस यांचा तुटवडा जाणवत असताना जगातील अनेक देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिका, फ्रान्स, युरोप, सिंगापूर, अस्ट्रोलिया, युएई या देशांनी भारताला मदत करण्याचं धोरण जाहीर केलं असून त्यासाठी सक्रीय पुढाकार देखील घेतला आहे.

संबंधित बातम्या