रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याकडून ‘यूएन’ला ऑफर: आमची लस वापरून पाहा!

पीटीआय
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

रशियाने कोरोना विषाणूविरोधात ‘स्पुटनिक -५’ ही लस तयार केली असली तरी फारच कमी चाचण्या घेऊन तयार केलेल्या या लशीच्या परिणामकारकतेबाबत अद्याप कोणत्याही जागतिक संघटनेने खात्री दिलेली नाही.

मॉस्को: रशियाने कोरोना विषाणूविरोधात ‘स्पुटनिक -५’ ही लस तयार केली असली तरी फारच कमी चाचण्या घेऊन तयार केलेल्या या लशीच्या परिणामकारकतेबाबत अद्याप कोणत्याही जागतिक संघटनेने खात्री दिलेली नाही. अशा परिस्थितीत रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी ही लस संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सर्व कर्मचाऱ्यांना मोफत पुरविण्याची तयारी दर्शविल्याने ‘यूएन’ संभ्रमात पडली आहे. 

‘यूएन’च्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या महासभेत बोलताना पुतीन यांनी रशियाकडून ही ‘ऑफर’ दिली. ते म्हणाले,‘‘आपल्यापैकी कोणालाही या विषाणूचा सामना करावा लागू शकतो. या विषाणूने संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्यांनाही सोडलेले नाही. या परिस्थितीत रशिया या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारे मदत करण्यास तयार असून विशेषत: त्यांना आमची लस मोफत पुरविण्यास आमची काहीही हरकत नाही. ही लस सुरक्षित असून माझ्या मुलीनेही ती घेतली आहे.’’ ‘यूएन’मधील काही सहकाऱ्यांनी रशियाकडे लशीची मागणी केली होती, त्यालाच आपण प्रतिसाद देत असल्याचेही पुतीन यांनी स्पष्ट केले. 

पुतीन यांच्या ‘ऑफर’वर संयुक्त राष्ट्रांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘लॅन्सेट’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालात रशियाची लस सुरक्षित असल्याचे आणि लशीमुळे प्रतिपिंडे तयार होत असल्याचे म्हटले आहे.

संबंधित बातम्या