सौदी अरेबियाने भारताला दिली दिवाळी भेट

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

मित्रत्वाचे संबंध असलेल्या सौदी अरेबियाने भारताला दिवाळी भेट दिली आहे. नव्या नोटेवर जगाचा नकाशा छापण्यात आला असून, त्यात पाकने आपल्या हद्दीत दाखविलेले काश्‍मीर आणि गिलगिट-बाल्टीस्तान वगळण्यात आले. 

लंडन : मित्रत्वाचे संबंध असलेल्या सौदी अरेबियाने भारताला दिवाळी भेट दिली आहे. नव्या नोटेवर जगाचा नकाशा छापण्यात आला असून, त्यात पाकने आपल्या हद्दीत दाखविलेले काश्‍मीर आणि गिलगिट-बाल्टीस्तान वगळण्यात आले. 

पीओकेमधील कार्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांच्या ट्‌विटमुळे हे स्पष्ट झाले. दिवाळी भेट असा उल्लेख त्यांनीच केला आहे. याचा संदर्भ असा की, ‘जी-20’ समूहाचे नेतृत्व सौदी अरेबियाकडे आहे. 21 व 22 नोव्हेंबर रोजी या समूहाची परिषद होणार आहे. त्यानिमित्त सौदी अरेबियाने 20 रियालची (सौदी चलन) विशेष नोट छापून तिचे अनावरण केले. त्यात पाकिस्तानच्या नकाशात वरील दोन भागांचा समावेश नाही. सौदीची ही कृती पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी कलंक आहे, असेही मिर्झा म्हणाले.

दरम्यान, महिला पत्रकार व कार्यकर्त्या नायला इनायत यांनी या संदर्भात इम्रान यांना टोला लगावला. सौदी अरेबियाचे युवराज महंमद बीन सलमान गेल्या वर्षी पाकिस्तान दौऱ्यावर आले होते. त्या वेळी इम्रान यांनी स्वतः मोटार चालवून त्यांना आपल्या अधिकृत निवासस्थानी आणले होते. त्याचा संदर्भ देत नायला यांनी ट्‌विट केले की, इम्रान हे महंमद बीन सलमान यांच्यासाठी ड्रायव्हर बनल्याची ही अशी फळे मिळाली आहेत.

संबंधित बातम्या