रशियाने पहिल्या लशितील दुष्परिणाम दूर करून दुसरी लास बनवली

पीटीआय
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

रशियाने पहिल्या लशितील दुष्परिणाम दूर करून दुसरी लास बनवली

मॉस्को: रशियाने कोरोनावरील दुसऱ्या लशीची निर्मिती करीत असून प्रयोगशाळेतील चाचण्या पुढील महिन्यात पूर्णत्वास येण्याची अपेक्षा आहे. पहिल्या लशीतील दुष्परिणाम यात होत नसल्याचा दावा करण्यात आला.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकल्पात उंदरावर केले जाणारे प्रयोग माणसांवर करण्यात आले. त्यासाठी स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात आली. त्यांना डोस दिल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. रोस्पोट्रेब्नाद्झोर या आरोग्य क्षेत्रातील प्रमुख संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार 57 जणांना लस टोचण्यात आली. त्यातील 43 जणांना डमी औषध देण्यात आले. एखाद्या उपचारानंतर रुग्णाला काळजी वाटत असेल तर असे एखादे द्रव्य दिले जाते, जे प्रत्यक्षात औषध नसते. चाचण्या सुरू असताना 23 जणांना केंद्रात दाखल करण्यात आले होते. 14 ते 21 दिवसांच्या अंतराने दोन इंजेक्शन दिल्यानंतर प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचा लशीचा उद्देश आहे. ऑक्टोबरमध्ये नोंदणी करून नोव्हेंबरमध्ये उत्पादन सुरू करण्याची रशियाला आशा आहे.

रशियाने 11 ऑगस्ट रोजी स्पुटनिक व्ही नाव असलेल्या पहिल्या लशीची घोषणा केली. त्यासाठी घाई केल्यामुळे टीका होत असतानाच दुसऱ्या लशीची माहिती जाहीर करण्यात आली. स्पुटनिक लशीचे दुष्परीणाम होतात. त्यामुळे सूज येणे, वेदना होणे, तीव्र ताप चढणे, लस टोचलेल्या ठिकाणी खाज सुटणे असे त्रास होत असल्याचा दावा करणाऱ्या बातम्या आल्या. दुसरी लस टोचण्यात आलेल्या 57 स्वयंसेवकांनी मात्र अशा त्रासाच्या तक्रारी केल्या नाहीत असे सांगण्यात आले.

आपल्या मुलीलाही लस टोचण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केल्यानंतर काही दिवसांत स्वयंसेवकांनी अशा त्रासाच्या तक्रारी केल्या. दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पुढील वर्षाच्या प्रारंभापूर्वी प्रमाणित लस येणार नाही असे गेल्याच महिन्यात जाहीर केले होते.
 

संबंधित बातम्या