सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरु

hongkong
hongkong

हाँगकाँग

नागरिकांचा विरोध असला तरी चीनच्या नियंत्रणाखालील हाँगकाँग प्रशासनाने नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. हाँगकाँगमध्ये स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी हे आवश्‍यकच होते, असे प्रतिपादन हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅम यांनी आज केले. स्वायत्तता देण्याच्या बोलीवर ब्रिटनने त्यांची वसाहत असलेल्या हाँगकाँगचा ताबा चीनकडे देण्याच्या घटनेला आज २३ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात कॅरी लॅम यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे समर्थन केले. लॅम यांच्या भाषणा आधीच येथील लोकशाहीवादी राजकीय पक्षांनी निषेध मोर्चा काढला होता.

कायद्याची अंमलबजावणी तातडीने
पोलिसांनी एक निवेदन प्रसिद्ध करत आंदोलकांना इशारा दिला आहे. हाँगकाँगला चीनपासून वेगळे करण्याची मागणी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे यात म्हटले आहे. तसेच, तिबेट आणि तैवानला पाठिंबा देणेही गुन्हा मानले जाणार आहे. शाळा, सामाजिक संघटना, माध्यमे, संकेतस्थळे आणि इतर संस्था-संघटनांवर नजर ठेवली जाणार आहे. राष्ट्रविरोधी घटना कोणती हे ठरविण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.

कायद्याअंतर्गत पहिली अटक
नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत हाँगकाँग पोलिसांनी आज एकाला अटक केली. निदर्शने करताना हाँगकाँगच्या स्वातंत्र्याची मागणी केल्याबद्दल त्याला ही अटक झाली असून या कायद्याअंतर्गत झालेली ही पहिलीच अटक आहे.

तैवानचा चीनला धक्का
चीनच्या अधिपत्याला आव्हान देणाऱ्या तैवानने चीनच्या नाकावर टिच्चून हाँगकाँगमधून स्थलांतर करणे सोयीचे जावे म्हणून कार्यालय स्थापन केले आहे. हाँगकाँगमधील गळचेपीविरोधात काही जणांनी तैवानमध्ये आश्रय घेण्याचे ठरविल्यास त्यांना मदत करण्यासाठी हे कार्यालय स्थापन केल्याचे तैवान सरकारने सांगितले. तैवान हा आमचाच भाग असल्याचा चीनचा दावा तैवानला अमान्य आहे.

असा आहे राष्ट्रीय सुरक्षा कायदा
गुन्ह्याचे चार प्रकार
- फुटीरतावाद : चीनचे विभाजन करण्याच्या हेतूने कृती करणे अथवा कट रचणे
- विद्‌ध्वंसक कृती करणे : सरकारी इमारतींचे नुकसान करणे
- दहशतवाद : सार्वजनिक सेवेचे नुकसान करणे, त्यावर हल्ला करणे
- फितुरी : इतर देशांशी हातमिळवणी करून देशाच्या सुरक्षेला बाधा आणणे, चीन सरकारविरोधात प्रक्षोभ निर्माण करणे

गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार शिक्षा
- कमाल शिक्षा जन्मठेप
- किंवा दहा वर्षांचा तुरुंगवास
- किंवा तीन वर्षांचा तुरुंगवास
- किंवा दंड

कायद्यामुळे काय बदल होणार?
- स्थानिक कायद्याला बांधिल नसलेल्या अधिकाऱ्यांना हाँगकाँगमध्ये नेमणार
- या कायद्याअंतर्गत अटक झालेल्या व्यक्तीवरील सर्व कारवाई चीन सरकारकडे शक्य
- स्थानिक प्रशासन गुन्ह्याची प्रकरणे चीनकडे वर्ग करू शकणार
- हाँगकाँगमध्ये वास्तव्यास नसलेल्या हाँगकाँगच्या नागरिकांनाही कायदा लागू
- काही प्रकरणांची सुनावणी बंद खोलीतच होणार
- विना वॉरंट घरांची झडती घेणे, पुरावे गोळा करणे, फोन टॅप करणे, हेरगिरी करणे, सोशल मीडियावरून माहिती काढून टाकणे असे अधिकार पोलिसांना मिळणार
- विदेशी कंपन्यांवर विशेष लक्ष ठेवता येणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com