कोरोना चाचण्या अत्यंत बोगस

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

जागतिक साथीच्या रूपाने थैमान घालत असलेल्या कोरोनापेक्षाही या रोगाचे निदान करणारी चाचणी म्हणजे काहीतरी गौडबंगाल आहे हा समज म्हणजे गैरसमज नसल्याचे दर्शविणारी एक महत्त्वाची प्रतिक्रिया अधिकृतरित्या उमटली आहे.

न्यूयॉर्क :  जागतिक साथीच्या रूपाने थैमान घालत असलेल्या कोरोनापेक्षाही या रोगाचे निदान करणारी चाचणी म्हणजे काहीतरी गौडबंगाल आहे हा समज म्हणजे गैरसमज नसल्याचे दर्शविणारी एक महत्त्वाची प्रतिक्रिया अधिकृतरित्या उमटली आहे. जगप्रसिद्ध अमेरिकी उद्योजक इलॉन मस्क यांनी, ‘चाचण्यांच्या नावाखाली काहीतरी अत्यंत बोगस चाललेय,-- असे म्हटले आहे.

एकाच दिवसात चार चाचण्या केल्यानंतर दोन अहवाल निगेटिव्ह, तर दोन पॉझिटिव्ह आल्याचे ट्विट त्यांनी केले. आता आपण वेगवेगळ्या प्रयोगशाळांमधून पॉलीमरेज चेन रिअॅक्शन (पीसीआर) चाचणी सुद्धा करून घेतली असून त्या अहवालांच्या प्रतीक्षेत असल्याचेही नमूद केले आहे.एका युजरने या ट्विटनंतर, तुम्हाला काय त्रास होतोय, असे विचारले. त्यावर मस्क यांनी सांगितले की, सर्दीची नेहमीची लक्षणे जाणवत आहेत, मात्र आतापर्यंत काहीही वेगळे जाणवलेले नाही. टेस्ला समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मस्क यांनी कोविड-१९ चाचण्यांच्या अचूकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बेक्टन डिकीन्सन कंपनीच्या रॅपीड अँटीजेन टेस्ट किटच्या संदर्भात त्यांनी हे म्हटले आहे. याचे कारण ट्विटमध्ये तसा उल्लेख आहे.

लॉकडाउनला विरोध
मस्क यांनी कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाउन तसेच निर्बंधांवर टीका केली होती. या धोरणाचा फॅसिस्ट असा उल्लेख करून त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग असल्याचे सांगितले होते.
तेच यंत्र, तीच चाचणी, तीच परिचारिका...
मस्क यांनी म्हटले आहे की, गुरुवारी चार वेळा माझी चाचणी झाली. तेच यंत्र, तीच चाचणी आणि इतकेच नव्हे तर तीच परिचारिका असे असूनही दोन अहवाल निगेटीव्ह, तर दोन पॉझिटिव्ह आले.
बेक्टन डिकीन्सनकडून तपासणी
बेक्टन डिकीन्सन ही अँटीजेन टेस्ट किटची प्रमुख पुरवठादार कंपनी आहे. त्यांच्या किटच्या वापरानंतर चाचण्यांचे चुकीचे पॉझिटिव्ह अहवाल येत असल्याचे  अमेरिकेतील शुषृशा गृहांकडून कळवण्यात आले होते. यासंदर्भात तपासणी करीत असल्याचे कंपनीने सांगितले होते. सप्टेंबरमधील या घडामोडीनंतर या महिन्यात अमेरिकी अन्न-औषध प्रशासनाने तसा इशारा प्रयोगशाळांतील कर्मचारी तसेच आरोग्यसेवा पुरवठादारांना दिला होता.

संबंधित बातम्या