दक्षिण कोरीया अमेरीका चर्चा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 जुलै 2020

अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री स्टीफन बिगन मंगळवारी सोलमध्ये दाखल झाले. तेव्हापासून त्यांनी विविध नेत्यांशी चर्चा केली.

सोल

शेजारी पण शत्रू देश उत्तर कोरियाबरोबर अण्वस्त्र धोरणाबद्दल ठप्प पडलेली चर्चा अमेरिकेने पुन्हा सुरु करावी असे आवाहन दक्षिण कोरियातर्फे करण्यात आले आहे. अमेरिकेला सुद्धा ही चर्चा सुरु करण्याचे महत्त्व वाटते असा दावाही करण्यात आला.
अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री स्टीफन बिगन मंगळवारी सोलमध्ये दाखल झाले. तेव्हापासून त्यांनी विविध नेत्यांशी चर्चा केली. त्यांच्यासमवेत गुरुवारी अध्यक्षांच्या नवनियुक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुह हून यांनी चर्चा केली. अमेरिका-उत्तर कोरिया चर्चेच्या महत्त्वावर भर देत त्यांनी दक्षिण कोरियाशी घनिष्ठ समन्वय राखण्यास सहमती दर्शविली. हून म्हणाल्या की, बिगन यांच्या प्रयत्नांचे महत्त्व मला माहीत असून त्यांनी ते सुरु ठेवावेत.

उत्तर कोरियाला दोष

बुधवारी बिगन यांनी उत्तर कोरियाशी चर्चा करण्यास अमेरिकेचा दृष्टिकोन खुला असल्याचे सुचित केले होते, पण उत्तर कोरियाला दोषही दिला होता. उत्तर कोरियाने कितीही दडपण आणले तरी चर्चा सुरु करण्यासाठी त्यांना सवलती देण्याची शक्यता बिगन यांनी फेटाळून लावली होती. अमेरिकेची विचारसरणी जुन्या पद्धतीची असून त्यांच्या शत्रुत्वाच्या धोरणामुळे चर्चा ठप्प झाल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता. चर्चा सुरु करण्यास खरोखरच कटिबद्ध असल्यास अमेरिकेने आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवावेत आणि सुरक्षेची खात्री द्यावी अशी मागणीही उत्तर कोरियाने यापूर्वी केली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचेय सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यात दोन शिखर बैठक अपयशी ठरल्यापासून ही चर्चा ठप्प झाली आहे. कोरियन द्वीपकल्पात चिरस्थायी शांतता निर्माण व्हावी म्हणून दक्षिण कोरिया या चर्चेसाठी आग्रही आहे.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळनंतर बिगन जपानला जाण्याची अपेक्षा आहे. ते अमेरिकी हवाई दलाच्या विमानाने या दौऱ्यावर आले होते.

संपादन - अवित बगळे

 

संबंधित बातम्या