दक्षिण, पश्‍चिम अमेरिकेत साथ तीव्र

Dainik Gomantak
शुक्रवार, 26 जून 2020

नेत्यांसह बंदिवासाला कंटाळलेली जनता जबाबदार
 

ह्युस्टन

अमेरिकेच्या दक्षिण आणि पश्‍चिम भागांत कोरोना पुन्हा डोके वर काढत असून दोन महिन्यांतील प्रयत्न धुळीस मिळत आहेत. या भागांत संसर्गाचे प्रमाण तीव्र पातळीवर जात आहे. राजकारणी आणि बंदिवासात राहण्यास कंटाळलेली जनता हे दोन घटक संकट ओढवून घेत आहेत, असा इशारा रुग्णालय प्रशासक आणि आरोग्य तज्ञांनी दिला आहे.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार बुधवारी एका दिवसात 34 हजार 700 रुग्णांची नोंद झाली, जी एप्रिलच्या अखेरपासूनची सर्वाधिक आहे. त्याआधी 36 हजार 400 आकडा होता. न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी अशा आधीच्या हॉटस्पॉटमधील नव्या रुग्णांचे आकडे कमी होत असताना इतर अनेक प्रांतांमध्ये एका दिवसातील विक्रमी वाढीची नोंद होत आहे. यात ऍरिझोना, कॅलिफोर्निया, मिसिसीपी, नेवाडा, टेक्‍सास आणि ओक्‍लाहोमा यांचा समावेश आहे. उत्तर आणि दक्षिण कॅरोलायना या प्रांतांमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांचे प्रमाण विक्रमी ठरले.

लोक गाफील बनले आहेत. त्यामुळे संसर्ग पुन्हा उसळून अगदी बिनधास्तपणे आपल्याला त्रस्त करीत आहे. लोकांना निर्बंधांनुसार काटेकोर वागावे लागेल आणि एकत्रित प्रयत्न करावे लागतील. हॉटेल, कार्यालयांत लोकांनी निर्बंध वाऱ्यावर सोडल्याचे पाहिल्यावर मी संतप्प होतो.
- डॉ. मार्क बूम, ह्युस्टन मेथॉडिस्ट हॉस्पीटलचे "सीईओ'

निधी रोखण्याचा इशारा
मास्क आणि इतर उपाययोजना धुडकावून लावणाऱ्यांना स्थानिक सरकारकडून मिळणारा कोरोनासाठीचा निधी रोखला जाईल, असा इशारा कॅलिफोर्नियाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे गव्हर्नर गावीन न्यूसॉम यांनी दिला आहे. कॅलिफोर्नियात सात हजार शंभर, तर फ्लोरिडामध्ये साडे पाच हजार रुग्णांची नोंद झाली.

संसर्गात वाढ
- टेक्‍सास ः एक मेपासून लॉकडाऊन उठताच रुग्णालयात दाखल झालेल्यांची संख्या दुप्पट, तर नव्या रुग्णांची तिप्पट, तीव्र संसर्गामुळे स्थानिक पातळीवर नव्याने निर्बंध लादण्याचे गव्हर्नर ग्रेग ऍबॉट यांचे संकेत, रुग्णालयांत जागा राखून ठेवण्यासाठी याची गरज.
- ह्युस्टन ः अतिदक्षता विभागातील क्षमता जवळपास भरली, दोन सार्वजनिक रुग्णालयांतील रुग्णांची संख्या क्षमता संपण्याच्या आसपास अशी महापौर सिल्वेस्टर टर्नर यांची माहिती
- अलाबामा ः अतिदक्षता विभागात केवळ 17 टक्के खाटा उपलब्ध, रुग्णालये या क्षमतेत वाढ करू शकत असली तरी संसर्गावर मात करण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचे रुग्णालय संघटनेचे प्रमुख डॉ. डॉन विल्यमसन यांच्याकडून स्पष्ट
- ऍरिझोना ः तातडीच्या उपचारासाठी दिवसाला सुमारे बाराशे संशयित रुग्ण दाखल, महिन्याभरापूर्वी हाच आकडा पाचशेच्या आसपास, प्रमाण वाढतच राहिल्यास पुढील कित्येक आठवडे रुग्णालयांना क्षमतेपेक्षा जास्त ताण पेलणे अटळ होईल असा ऍरिझोना विद्यापीठाचे तज्ञ डॉ. जोसेफ गेराल्ड यांचा इशारा.
- उत्तर कॅरोलायना ः डेमोक्रॅटिक पक्षाचे गव्हर्नर रॉय कुपर यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सक्तीचे असल्याचा आदेश जारी
- फ्लोरिडा ः अनेक परगणे व शहरांत मास्क बंधनकारक

संबंधित बातम्या