पोलादी पकड आणखी काही वर्षे

Dainik Gomantak
शनिवार, 27 जून 2020

पुतीन यांना अधिक कार्यकाल देण्यासाठी रशियात मतदान

मॉस्को

गेली दोन दशके रशियाची सत्तासूत्रे आपल्या हाती ठेवण्यात यशस्वी ठरलेले अध्यक्ष व्लादीमिर पुतीन हे आणखी काही वर्षे देशाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. रशियामध्ये आज राज्यघटनेमधील एका दुरुस्तीसाठी मतदान झाले. या घटनादुरुस्तीमुळे पुतीन हे आणखी दोन कार्यकाल, म्हणजे २०३६ पर्यंत पदावर राहू शकणार आहेत.
पुतीन यांनी जानेवारीत घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मांडले. रशियात विरोधकांची ताकद फारशी नसल्याने हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सहज मंजूर झाले. यामुळे खरेतर या घटनादुरुस्तीवर सार्वमत घेण्याची आवश्‍यकता नव्हती. तरीही, जनतेचा पाठिंबा असल्यास नैतिक अधिकार मिळेल, असे पुतीन यांचे म्हणणे होते. सरकारने एक जुलै ही मतदानाची अधिकृत तारीख निश्‍चित केली आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आजपासूनच मतदान केंद्रे उघडण्यात आली आहेत. घटनादुरुस्तीनुसार, रशियाचे अध्यक्षांना सहा वर्षांचे दोन कार्यकाल मिळणार आहेत. तसेच, पुतीन यांचा आधीचा अध्यक्षीय पदाचा कार्यकाल जमेस धरला जाणार नाही. या घटनादुरुस्तीमुळे पुतीन हे रशियाचे कायमस्वरुपी अध्यक्ष बनतील, अशी टीका विरोधकांनी केली आहे. मात्र, यामुळे रशियामध्ये स्थैर्य वाढेल, असा दावा पुतीन यांनी केला आहे. पुतीन यांची २०१८ मध्ये रशियाचे अध्यक्ष म्हणून चौथ्यांदा निवड झाली होती. २०२४ मध्ये होणारी पुढील निवडणूक आपण लढणार असल्याचे त्यांनी अद्याप जाहीर केले नसले तरी हा पर्याय खुला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. घटनादुरुस्तीनुसार, रशियाच्या अध्यक्षांना वरिष्ठ न्यायाधीशांची आणि वकिलांची नेमणूक करता येणार आहे. तसेच, पुतीन यांना परंपरावादी मतांना दृढ करत समलिंगी विवाहावर बंदीही घालता येणार आहे. याशिवाय, किमान वेतन मर्यादा आणि महागाईनुसार निवृत्तीवेतनात बदल अशा आर्थिक सुधारणाही करता येणार आहेत.

आंदोलने आणि निषेध
माजी गुप्तहेर असलेल्या पुतीन यांनी अध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून वीस वर्षे रशियाचे नेतृत्व केले आहे आणि आणखी चार वर्षे त्यांचा अधिकृत कार्यकाल आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत रशियाला अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागल्यामुळे आणि निवृत्ती वेतन धोरणात बदल केल्यामुळे त्यांची लोकप्रियता बरीच घटली आहे. या मतदानाला विरोध करणारे अनेक मोर्चे रशियात निघाले. मात्र, पोलिसांनी कोरोनाचे कारण देत आंदोलकांना पिटाळून लावले. मात्र, याच कोरोनाकाळात रशियात हजारोंच्या उपस्थितीत कालच (ता. २४) विजय दिनाचे संचलन झाले. इंटरनेटच्या माध्यमातूनही पुतीन यांच्याविरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, पुतीन यांची पोलादी पकड पाहता यातील कोणतीही बाब त्यांच्या विजयाच्या आड येण्याची तूर्त शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

संबंधित बातम्या