पाकिस्तानमधील अत्याचारांविरोधात कठोर पावले उचला: यूएन

पीटीआय
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

मानवाधिकार आयोगाची पाकिस्तानवर टीका

जीनिव्हा:  पाकिस्तानमधील पत्रकार, महिला आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांवरून संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) आज पाकिस्तानला फटकारले. सरकारने धार्मिक अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात कडक पावले उचलावीत आणि विविध विचारसरणींचा आदर करावा, असे ‘यूएन’ने बजावले आहे. 

पाकिस्तानमध्ये पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर ऑनलाइन आणि ऑफलाइन हल्ले होत आहेत. यामध्ये महिलांना आणि अल्पसंख्याकांना विशेषकरून लक्ष्य केले जात असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेच्या निदर्शनास आले असल्याचे मानवाधिकार विभागाचे उच्चायुक्त रुपर्ट कोल्विल यांनी सांगितले. धर्मनिंदेचा आरोप झालेल्या व्यक्तीचा तर जीवही येथे धोक्यात येतो, असेही ते म्हणाले. पाकिस्तानात धर्मनिंदा विरोधी कायद्याचा वापर होत असल्याचा आणि वैयक्तिक किंवा राजकीय सूड उगविण्यासाठी बेकायदा पद्धतीने केला जात असल्याचे कोल्विल यांनी सांगितले. याबाबत त्यांनी पाकिस्तानचा निषेध करणारे एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानात चार पत्रकारांची हत्या झाली, यापैकी दोन महिला होत्या. पाकिस्तान सरकारने या प्रकारांविरोधात पाऊले उचलावीत, असा मानवाधिकार आयोगाचा आग्रह आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

संबंधित बातम्या