आक्रमक चीनविरुद्ध डोनाल्ड ट्रम्पना पाठिंबा द्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

चिनी मानवी हक्क कार्यकर्त्याचे अधिवेशनात भाषण

न्यूयॉर्क: आक्रमक चीनला रोखण्यासाठी इतर देशांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना साथ द्यावी असे आवाहन चीनच्या एका मानवी हक्क कार्यकर्त्याने केले आहे. अंध असलेल्या या नीडर नागरिकाने रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून हे वक्तव्य करणे महत्त्वपूर्ण ठरले आहे. चेन गुआंगचेंग असे त्यांचे नाव आहे.

चीनी कम्युनिस्ट पक्ष हा मानवतेचा तसेच त्यांच्या स्वतःच्याच लोकांचा शत्रू आहे, असे सांगून गुआंगचेंग म्हणाले की, जुलमाविरुद्ध उभे ठाकणे सोपे नसते. मला याचा अनुभव आहे. एकच अपत्य व इतर अन्यायकारक धोरणांविरुद्ध मी आवाज उठविला तेव्हा चिनी कम्युनिस्ट पक्षाकडून माझा छळ करण्यात आला. मला तुरुंगात डांबण्यात आले. मला नजरकैदेत ठेवण्यात आले.

गुआंगचेंग हे जन्मतः अंध असून त्यांनी स्वयंशिक्षणाने कायदा शिकला आहे. त्यांनी आपले भाषण लिहून आणले होते. त्यांनी सारांशाचे मुद्दे सांगितले. नंतर ट्रम्प प्रचार समिती तसेच स्वतः त्यांनी संपूर्ण भाषण जारी केले.

चीनवरील त्यांची टीका चौफेर होती. ते म्हणाले की, आपल्या सीमेबाहेर चिनी कम्युनिस्ट पक्ष आंतरराष्ट्रीय करार आणि निकषांकडे दुर्लक्ष करते. हाँगकाँगमधील हक्कांची पायमल्ली, व्यापार करारात फसवणूक, तैवानला धमकावणे, जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्लूएचओ) शोषण करणे अशी अनेक उदाहरणे आहेत. अशा अन्यायाविरुद्ध उभे ठाकणे सोपे नसले तरी ट्रम्प यांनी याच आघाडीवर पुढाकार घेतला असून हा आपल्या भवितव्यासाठीचा लढा आहे. त्यामुळे जगाच्या हितासाठी आपण ट्रम्प यांना पाठिंबा द्यावा, त्यांना मत द्यावे.

संबंधित बातम्या