पॅरिसमध्ये सुरक्षा कायद्याविरुद्ध हजारो नागरिकांकडून अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याविरूद्ध निदर्शने

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 डिसेंबर 2020

प्रस्तावित सुरक्षा कायद्याविरुद्ध हजारो नागरिकांनी मॅक्रॉन यांचा शांततापूर्ण मार्गाने निषेध केला. ब्लॅक ब्लॉक या अराजकवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मात्र पोलिसांशी झटापटी झाल्या.

पॅरिस  :   फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात सलग दुसऱ्या आठवड्यात पॅरिसमध्ये निदर्शने झाली. प्रस्तावित सुरक्षा कायद्याविरुद्ध हजारो नागरिकांनी मॅक्रॉन यांचा शांततापूर्ण मार्गाने निषेध केला. ब्लॅक ब्लॉक या अराजकवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मात्र पोलिसांशी झटापटी झाल्या. बहुतांश नागरिकांनी फ्रान्स - पोलीस हक्कांची भूमी आणि सुरक्षा कायदा मागे घ्या असे फलक झळकावत मोर्चा काढला. दुसरीकडे जॅकेट घातलेल्या असंख्य अराजकवाद्यांनी पोलिसांवर वेगवेगळ्या वस्तूंचा मारा केला. 

 

दुकानांच्या सजावटीच्या भागांची नासधूस, मोटारींची तोडफोड, बॅरीकेड््स पेटवणे असे प्रकारही घडले. त्यांना रोखण्यासाठी शनिवारी सुमारे तीन तास पोलिसांना झगडावे लागले. अश्रुधुराच्या नळकांड्या वारंवार फोडणे पोलिसांना भाग पडले. अराजकवाद्यांच्या एका गटाने एका बँकेच्या कार्यालयात धुडगूस घातला. तेथील कागदपत्रांचे गठ्ठे बाहेर लागलेल्या आगीत फेकून देण्यात आले.
नव्या सुरक्षा कायद्यामुळे नागरी स्वातंत्र्यावर बंधने येतील असे निदर्शकांचे म्हणणे आहे. पॅरिसशिवाय मार्सेली, लियाँ, लिली आणि इतर शहरांमध्येही निदर्शने झाल्याचे वृत्त आहे. बीएफएम टीव्हीच्या वृत्तानुसार सुमारे पाचशे दंगलखोरांनी निदर्शनांना गालबोट लावले.

 

निवडणुकीचा संदर्भ

फ्रान्समध्ये २०२२ मध्ये निवडणूक होणार आहे. मॅक्रॉन यांनी कायदा आणि सुव्यवस्था कडक करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचा एक भाग म्हणून सुरक्षा विधेयक मांडण्यात येईल. ऑनलाईन द्वेष मोहिमांपासून पोलिसांचे संरक्षण करण्याचा मॅक्रॉन यांचा उद्देश आहे. या विधेयकानुसार टेहळणीच्या पद्धती व त्यासाठीची साधनसामग्री वाढवण्यात येईल. प्रसार माध्यमे आणि संकेतस्थळांवर पोलिस अधिकाऱ्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यावर मर्यादा घातल्या जातील.
गेल्या महिन्याच्या अखेरीस कृष्णवर्णीय संगीत निर्माते मिचेल झेक्लर यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली.  मोबाईल फोनवरील  छायाचित्रण व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सामान्य नागरिकही संतापले आहेत. 

 

कृष्णवर्णीयांची जास्त झडती

ओळखपत्र तपासण्यासाठी पोलीस कृष्णवर्णी नागरिकांना थांबवण्याची जास्त शक्यता आहे असे मॅक्रॉन यांनी शुक्रवारी जाहीरपणे मान्य केले होते. त्याचवेळी अनावश्यक झडतीची नोंद करण्यासाठी संकेतस्थळ सुरू केले जाईल असेही त्यांनी जाहीर केले.

 

पोलिस संघटना संतप्त

पोलिस वर्णभेदी आहेत असे वक्तव्य मॅक्रॉन यांनी केले होते. त्यामुळे पोलीस संघटना संतप्त झाल्या आहेत. हे वक्तव्य लाजिरवाणे असल्याचे सांगत अलायन्स पोलिसने वर्णभेदाचा आरोप फेटाळून लावला. द अल्टरनेटीव पोलीस तर्फे आकस्मिक तपासणी मोहीम थांबवण्याचा इशारा देण्यात आला.

संबंधित बातम्या