आयुर्वेदिक औषधाच्या चाचणीचे प्रयत्न : संधू

पीटीआय
शुक्रवार, 10 जुलै 2020

भारत आणि अमेरिकेतील संस्थांमध्ये असलेल्या देवाणघेवाणीमुळे संशोधकांना जवळ आणले आहे.

वॉशिंग्टन

कोरोना विषाणूविरोधात उपचार म्हणून आयुर्वेदीक औषधाची प्रयोगशाळेत संयुक्तरित्या चाचणी करण्यासाठी भारत आणि अमेरिकेतील आयुर्वेदीक डॉक्टर आणि संशोधक नियोजन करत असल्याचे अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू यांनी आज सांगितले. त्यांनी आज काही प्रसिद्ध भारतीय वंशाचे अमेरिकी शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ज्ञ आणि डॉक्टरांशी ऑनलाइन संवाद साधला.
संधू म्हणाले की,‘‘भारत आणि अमेरिकेतील संस्थांमध्ये असलेल्या देवाणघेवाणीमुळे संशोधकांना जवळ आणले आहे. संयुक्त शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनातून आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी भारतातील संस्था इतर संस्थांशी भागीदारी करत आहेत. त्याचाच भाग म्हणून दोन्ही देशांमधील आयुर्वेदिक डॉक्टर आणि संशोधक एकत्र येऊन कोरोनावर आयुर्वेदीक औषध तयार करून त्याची प्रयोगशाळेत चाचणी करण्याचे नियोजन करत आहेत. आमचे शास्त्रज्ञ याबाबतचे त्यांचे ज्ञान आणि स्रोत इतरांनाही देत आहेत.’’ भारत-अमेरिका विज्ञान तंत्रज्ञान फोरमने संयुक्त कार्यक्रम राबवत कायमच विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाला प्राधान्य दिले आहे, असेही ते म्हणाले. भारतातील तीन कंपन्या अमेरिकेतील कंपन्यांबरोबर लस निर्मितीसाठी प्रयत्न करत असल्याची माहितीही संधू यांनी यावेळी दिली.

संपादन -अवित बगळे

 

संबंधित बातम्या