नकाशातील लडाखबद्दलची चूक ‘ट्विटर’ला मान्य

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

लडाखचा भूभाग जिओ टॅगद्वारे चीनचा हिस्सा दाखविण्यावरून ‘ट्विटर’ने आपली चूक मान्य केली आहे. ही चूक दुरुस्त करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतही ट्विटरने मागितली आहे. संसदीय स्थायी समितीसमोर ‘ट्विटर’ने प्रतिज्ञापत्राद्वारे चूक मान्य केली आहे.

नवी दिल्ली :  लडाखचा भूभाग जिओ टॅगद्वारे चीनचा हिस्सा दाखविण्यावरून ‘ट्विटर’ने आपली चूक मान्य केली आहे. ही चूक दुरुस्त करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतही ट्विटरने मागितली आहे. संसदीय स्थायी समितीसमोर ‘ट्विटर’ने प्रतिज्ञापत्राद्वारे चूक मान्य केली आहे. ट्विटरने गेल्या महिन्यात या प्रकाराबद्दल तोंडी माफी मागितली होती. मात्र, संसदीय समितीने त्यांचा माफी प्रस्ताव फेटाळून, लेखी माफी मागा व तसे रीतरसर प्रतिज्ञापत्र द्या, असे बजावले होते. 

डेटा संरक्षण विधेयकाचे अध्ययन करणाऱ्या संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षा आणि भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी ही माहिती दिली. ‘ट्विटर’च्या मुख्य गुप्तता अधिकाऱ्यांनी समितीपुढे प्रतिज्ञापत्र सादर करून चूक मान्य केली. लडाखचा एक हिस्सा चुकीच्या जिओ टॅगिंगमुळे चीनच्या हद्दीत दाखविण्यात आला. ही चूक दुरुस्त करण्यासाठी ट्विटरला ३० नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी लागणार असल्याचेही श्रीमती लेखी यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी ‘ट्विटर’ने लडाखचे मुख्यालय असलेले लेह हे स्थान चिनी नकाशामध्ये दर्शविल्यावरून गदारोळ निर्माण झाला होता. त्यानंतर माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या सचिवांनी ट्विटरच्या प्रमुखांना पत्र लिहून जोरदार आक्षेप नोंदवताना देशाच्या सार्वभौमत्वाचा अनादर करण्याचा ट्विटरचा कोणताही प्रकार मान्य केला जाणार नाही, असे फटकारले होते. त्यानंतर डेटा संरक्षण विधेयकाशी संबंधित संसदीय स्थायी समितीने या मुद्द्यावर ‘ट्विटर’च्या अधिकाऱ्यांना पाचारण करून जाब विचारला होता. 

‘ट्विटर’ भारताच्या भावनांचा ट्विटर आदर करते, असे या सोशल मीडिया कंपनीच्या प्रतिनिधींचे म्हटले होते. मात्र लडाख चीनच्या नकाशात दर्शविण्याची चूक तांत्रिक असल्याचा खुलासा केला होता. हा खुलासा संसदीय समितीने फेटाळून लावताना हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत असल्याने ट्विटरचा खुलासा पुरेसा नाही, असे सुनावले होते. तसेच या गुन्हेगारी कृत्याबद्दल सात वर्षाची तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद असल्याचा इशाराही दिला होता.

संबंधित बातम्या