ब्राझीलच्या अध्यक्षांविरुद्ध दोन दावे

Agencies
शनिवार, 11 जुलै 2020

कोरोना पॉझिटीव येऊनही पत्रकार परिषदेत मास्क काढला

साओ पावलो

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच कोरोनाला कमी लेखलेले आणि परिणामी टीकेचे धनी बनलेले ब्राझीलचे अध्यक्ष जाइर बोल्सोनारो आणखी अडचणीत आले आहेत. पत्रकार परिषदेत मास्क काढल्यामुळे त्यांच्याविरुद्ध दोन दावे दाखल होणार आहेत.
कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव आला असला तरी आपली प्रकृती उत्तम असल्याचे पत्रकारांना दाखविण्यासाठी मंगळवारी मुलाखतीदरम्यान त्यांनी मास्क काढण्याचे धक्कादायक कृत्य केले होते. त्यामुळे वृत्तपत्र संघटना दावा दाखल करणार आहे. एबीआय (असोसियाओ ब्रासीलैरा डी इम्परेन्सा) असे नाव असलेल्या या संघटनेने एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार बोल्सोनारो यांच्या कृतीमुळे काही पत्रकारांच्या जिवाला धोक्याची शक्यता निर्माण झाली.
सोमवारी किंचित ताप आल्यामुळे बोल्सोनारो यांची चाचणी घेण्यात आली, जिचा अहवाल पॉझिटीव आला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले नव्हते. पॉझिटिव असलो तरी आपल्याला काहीही झालेले नाही, उलट छान वाटत असल्याचे सांगताना त्यांनी मास्कही बाजूला घेतला.
संघटनेचे अध्यक्ष पाउलो जेरोनिमो डी सौसा यांनी सांगितले की, कोरोना संसर्ग झाल्याची कल्पना असूनही अध्यक्ष गुन्हेगारी मार्गाने वागत आहेत. त्यामुळे इतरांचा जीव धोक्यात आला आहे.

संसद सदस्यही न्यायालयात
मंगळवारी पत्रकार परिषद होताच संसद सदस्य मार्सेलो फ्रैक्सो यांनी बोल्सोनारो यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करू असे जाहीर केले होते. डाव्या विचारसरणीच्या सोशॅलिझम लिबर्टी पार्टीचे नेते व प्राध्यापक असलेले मार्सेलो म्हणाले की, दंडसंहितेच्या दोन कलमांचा बोल्सोनारो यांनी भंग केला आहे.

अध्यक्ष बोल्सोनारो यांचे वर्तन बेजबाबदारपणाच्याही पलीकडचे आहे. कोरोना साथीविरुद्ध उपाययोजना करण्याऐवजी जनतेच्या आरोग्याविरुद्ध ते गुन्हा करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
- पाउलो जेरोनिमो डी सौसा, ब्राझील प्रेस संघटना प्रमुख

त्या पत्रकारांचे क्वारंटाइन
बोल्सोनारो यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेल्या पत्रकारांचे क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणीही घेतली जाणार आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या