..आणि अखेर लस आली!; pfizerच्या लशीला मान्यता देत ब्रिटनने घेतला ऐतिहासिक निर्णय

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 डिसेंबर 2020

Pfizer- Biotechने विकसित केलेल्या लशीला ब्रिटनने मान्यता दिली आहे. एवढेच नाही पुढील आठवड्यापासून  या लसीकरणाला सुरूवातही करण्यात येणार आहे. 

 लंडन - मागील वर्षभरापासून अक्षरश: थैमान घालणाऱ्या कोरोनावर प्रभावी लस शोधण्याचे प्रयत्न सबंध विश्वात केले जात होते.  याबाबत एक आनंदाची बाब समोर आली असून Pfizer- Biotechने विकसित केलेल्या लशीला ब्रिटनने मान्यता दिली आहे. एवढेच नाही पुढील आठवड्यापासून तात्काळ या लसीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे. 

ब्रिटनकडून यावेळी या लशीला मान्यता देताना सांगण्यात आले की, आज इंडिपेंडंट मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्यूलेटरी एजन्सीने केलेली शिफारस स्वीकारण्यात आली असून पुढील आठवड्यापासून ही लस संपूर्ण ब्रिटनमध्ये उपलब्ध होणार  आहे. 

 दरम्यान, ब्रिटनकडून मान्यता मिळाल्यावर Pfizer कडून कोविड विरूद्ध लढाईतील हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, ब्रिटनमधील नागरिकांच्या संरक्षणासाठी एमएचआरएने काळजीपूर्वक मुल्यांकन करताना समयावर सारी प्रक्रिया पूर्ण केली. आम्ही त्यांच्या क्षमतेचे कौतूक करतो.  

लस कशी आणि कोणाला दिली जाईल?  

ब्रिटनमधील लसीकरण समिती कोणाला आधी लस द्यायची हे निश्चित करेल. ज्यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि वृद्धांचा समावेश करावा लागेल. वैद्यकीयरित्या कमजोर असलेल्यांनाही ही लस आधी दिली जाण्याची शक्यता आहे. pfizer biotech आणि मॉडर्ना कंपनीकडून विकसित करण्यात आलेली ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे.  त्यामुळे येणाऱ्या काळासाठी ही लस अत्यंत महत्वाची ठरेल. 

संबंधित बातम्या