कोरोना संसर्गाबाबत खोट्या बातम्या आणि रोखण्यासाठी पुढाकार घ्या

पीटीआय
रविवार, 13 सप्टेंबर 2020

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत तंत्रज्ञान कंपन्यांना भारताचे आवाहन 

न्यूयॉर्क: कोरोना संसर्गाबाबत खोट्या बातम्या आणि अफवा रोखण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्यांनी सर्व देशांना मदत करावी, असे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केले. चुकीच्या बातम्या आणि बनावट व्हिडिओमुळे लोकांचा सरकारवरील विश्‍वास उडून जातो, असे भारताने म्हटले आहे.

महासभेत  शांततेची संस्कृती या विषयावर उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी कोरोनामुळे होणाऱ्या दीर्घकालिन परिणामांवर चर्चा करण्यात आली. कोरोना संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून २८ लाखांहून अधिक जण बाधित झाले आहेत. यावेळी बोलताना भारताच्या राजदूत पौलमी त्रिपाठी म्हणाल्या की, संसर्गाच्या परिस्थितीत माहितीच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेकांचा जीव धोक्यात असतानाही जनतेसमोर जाणीवपूर्वक चुकीच्या माहितीचा प्रचार केला जात आहे, समाजात फूट पाडली जात आहे. यामुळे सरकारच्या विश्‍वासार्हतेवरही काही वेळा प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊन अडथळे निर्माण होतात. योग्य माहिती मिळत नसल्याने लोकांच्या निर्णय क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे जगभरातील तंत्रज्ञान कंपन्यांनी देशांना सहकार्य करत चुकीच्या बातम्या रोखणे आवश्‍यक आहे.

संसर्गामुळे अनिश्‍चिततेचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक विश्‍वासार्हतेला धक्का बसला आहे. हा प्रकार विकसीत देशांमध्येही दिसून येत आहे. अनेक वाद निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शांततेची संस्कृती कायम ठेवणे आवश्‍यक आहे. - अँटोनिओ गुटेरेस, सरचिटणीस, यूएन

संबंधित बातम्या