अमेरिका-चीनमध्ये कलगीतुरा कायम

पीटीआय
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एकमेकांवर टीका

न्यूयॉर्क: काही महिन्यांपासून अनेक मुद्यांवरुन एकमेकांवर टीका करणाऱ्या आणि धमक्या देणाऱ्या अमेरिका आणि चीन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलतानाही ही संधी साधली. अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एका प्रचारसभेत चीनवर टीका केली. कोरोनासाठी चीनला जबाबदार धरण्याची मागणीही त्यांनी काल महासभेत केली होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनीही संसर्गाचे राजकारण टाळण्याचा सल्ला देताना चीनवरील आरोपांकडे साफ दुर्लक्ष केले.

पेनसिल्वानिया येथील एका प्रचारसभेत बोलताना ट्रम्प म्हणाले की, पुन्हा सत्तेवर निवडून आल्यास पुढील चार वर्षांत अमेरिकेला उत्पादन क्षेत्रातील महाशक्ती बनविण्याचा प्रयत्न केला जाईल. अमेरिकेचे चीनवरील अवलंबित्व कायमचे संपवून टाकू. विषाणूमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले असून मनुष्यहानीही मोठी झाली आहे. हा कोरोना विषाणू नव्हे, चिनी विषाणू आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षांनाही लक्ष्य करताना त्याला चीनवादाचा संदर्भ दिला. ‘विरोधक कायम रशियावर टीका करतात. रशियाशी माझ्याइतके कठोर कोणीही वागलेले नाही. मात्र, चीनबद्दल काय? विरोधक कधीही चीनचा उल्लेख करत नाहीत. त्या दोघांमध्ये काही तरी करार झाला असावा,’ असा आरोप ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांनी कालही चीनला संसर्गाबद्दल जबाबदार ठरवून कारवाईची मागणी केली होती.
 

संबंधित बातम्या